नवी दिल्ली : “माझ्या आईच्या अश्रूंपर्यंत तुम्ही पोहोचलात, पण, तुम्ही पहलगामध्ये दहशतवादी आले कसे हे सांगितलेच नाही. बैसरन पठारावर सुरक्षा तैनात का नव्हती हेदेखील तुम्ही सांगितले नाही. इथे मी सांगू इच्छिते की, माझ्या आईने अश्रू ढाळले जेव्हा माझ्या वडिलांचे दहशतवाद्यांनी प्राण घेतले. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात कुटुंबातील व्यक्तीला गमावण्याचे दुःख काय असते हे आम्हाला माहीत आहे. पहलगाममध्ये प्राण गमावलेल्या कुटुंबियांचे दुःख आम्ही समजते,” अशा शब्दांत काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी-वढेरा यांनी अमित शहांना प्रत्युत्तर दिले. दिल्लीतील बाटला हाऊसमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर सोनिया गांधींनी अश्रू ढाळले होते, असा आरोप शहांनी केला होता.
तुम्ही इतिहासाबद्दल बोलता, मी वर्तमानाबद्दल बोलेन. तुम्ही नेहमीच सबबी शोधता, तुम्ही संपूर्ण गांधी कुटुंबाची यादी करता. त्यांनी पूर्वी काय केले हे सांगता पण, तुम्ही ११ वर्षांपासून सत्तेत आहात. गौरव गोगोई यांनी गृहमंत्र्यांना प्रश्न उपस्थित केला होती की, पहलगाममध्ये सुरक्षा तैनात करणे तुमची जबाबदारी नव्हती का, त्यावेळी संरक्षण मंत्री राजनाथसिंह मान हलवत होते, पण, गृहमंत्री हसत होते, असे सांगत प्रियंका गांधी-वढेरा यांनी शहांना धारेवर धरले.
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी केंद्र सरकारमध्ये कोणीही घेतली नाही. २००८ मध्ये मुंबईमधील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी राजीनामा का दिला नाही. राजनाथसिंह केंद्रीय गृहमंत्री होते तेव्हा तीन दहशतवादी हल्ले झाले, त्यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला नाही. – प्रियंका गांधी-वढेरा, खासदार, काँग्रेस</strong>