लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी मतदान काल(दि.१३) पार पडलं. दिल्लीसह देशातल्या अनेक बड्या राजकीय नेत्यांनी काल मतदानाचा हक्क बजावला. दिल्लीत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी, त्यांचे पती रॉबर्ट वढेरा यांनीही मतदानाचा हक्क बजावला. मात्र, यावेळी प्रियंका गांधी यांचा मुलगा रेहान (वय-१९)हा मतदानावेळी उपस्थित नव्हता.
यावर्षी रेहान पहिल्यांदाच मतदान करणार होता, पण त्याने मतदान केलं नाही. याबाबत काल(दि.१३) पत्रकारांनी प्रियंका गांधी यांना मुलगा रेहान याने मतदान का केलं नाही असा प्रश्न विचारला. त्यावर प्रियंका यांनी उत्तर देताना ‘रेहानची परीक्षा सुरू आहे, त्यासाठी तो लंडनला गेला आहे’ असं सांगितलं. परीक्षा सुरू असल्यामुळे त्याला मतदान करता आलं नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.
काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये प्रियंका गांधी यांच्या निवडणूक प्रचारा दरम्यान रेहान आणि त्याची बहिण मिराया दोघंही उपस्थित होते. याशिवाय अमेठीमध्ये राहुल गांधी आपला निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेले होते त्यावेळीही दोघं बहिण-भाऊ उत्साहात त्यांच्यासोबत उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीत सहाव्या टप्प्यात ५९ जागांसाठी सरासरी ६३ टक्के मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये आठ जागांसाठी ८० टक्क्य़ांवर मतदान झाले. सहाव्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील १४, हरयाणातील १०, बिहार, मध्य प्रदेश व पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी ८, तर दिल्लीतील सर्व सात व झारखंडमधील चार जागांसाठी मतदान झाले. दिल्लीतील सात जागांपैकी ईशान्य दिल्लीत सर्वाधिक मतदान झाले, तर नवी दिल्ली मतदारसंघात कमी मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये सत्तारूढ तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप असा यंदा जोरदार संघर्ष आहे. तेथे रविवारी आठ मतदारसंघांत उत्साहात मतदान झाले.