पीटीआय, नवी दिल्ली
लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्यांकडून होणाऱ्या बलात्कार व खून यांसारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असल्यामुळे, लिव्ह-इन संबंधांच्या नोंदणीसाठी नियम तयार करण्याचे निर्देश केंद्र सरकारला द्यावेत, अशी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे.अशा संबंधांच्या नोंदणीसाठी नियम व मार्गदर्शक तत्त्वे तयार करावीत अशी मागणी करणाऱ्या या याचिकेत आफताब आमिन पूनावाला याने त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकर हिचा खून केल्याच्या ताज्या घटनेचा संदर्भ देण्यात आला आहे.
लिव्ह-इन संबंधांची नोंदणी केल्यामुळे दोन्ही लिव्ह-इन पार्टनरना एकमेकांबद्दल अचूक माहिती उपलब्ध होईल, तसेच सरकारलाही त्यांच्यापैकी प्रत्येकाची वैवाहिक स्थिती, त्यांचा गुन्हेगारी पूर्वेतिहास व इतर उपयुक्त तपशील कळू शकतील असे याचिकेत नमूद केले आहे.बलात्कार व खून यांसारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली असून, याशिवाय आपण लिव्ह-इन संबंधांत राहात असल्याचा दावा करणाऱ्या महिलांकडून बलात्काराच्या खोटय़ा तक्रारींमध्येही प्रचंड वाढ झाली आहे. अशावेळी लिव्ह-इन संबंधांमध्ये राहण्याच्या वस्तुस्थिती पुराव्याने सिद्ध होणे न्यायालयांना पुराव्यांतून शोधणे कठीण जाते, असे ममता राणी यांनी केलेल्या याचिकेत म्हटले आहे.