सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना आयआयटी (इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी) आणि आयआयएम (इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट) यांसारख्या सर्वोत्तम संस्थांमधून हुशार विद्यार्थ्यांची भरती करण्यास परवानगी मिळावी, अशी अपेक्षा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी व्यक्त केली.आयआयटी आणि आयआयएम यांसारख्या दर्जेदार सरकारी संस्थांमध्ये देशातील सर्वोत्तम विद्यार्थी प्रवेश घेतात आणि त्यावर मोठय़ा प्रमाणात सरकारी निधी खर्च होतो. मात्र सध्या सरकारी बँकांना तेथे जाऊन नोकरभरती करण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी नाही. बँकांना प्रत्येक जागेची जाहिरात देऊन उमेदवारांकडून नोकरीचे अर्ज मागवावे लागतात. त्यामुळे त्यांना या संस्थांतील दर्जेदार मनुष्यबळाला मुकावे लागते आणि समान संधी मिळत नाहीत, असे म्हणत भट्टाचार्य यांनी या विरोधाभासाकडे लक्ष वेधले.हे दर्जेदार आणि प्रशिक्षित मनुष्यबळ न मिळताही सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांनी चांगली कामगिरी केली आहे. ते मिळाल्यास त्यांची कामगिरी किती उंचावेल, असेही त्या म्हणाल्या.