आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या एका टि्वटमुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. ज्यामध्ये त्यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याला दुर्घटना ठरवले आहे. भारतीय हवाई दलाने बालकोट येथे केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये नेमके किती दहशतवादी ठार झाले त्याची आकडेवारी मागणारे काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याला ‘दुर्घटना’ म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिग्विजय सिंह यांनी एकापाठोपाठ एक टि्वट करुन नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करताना पुलवामा दहशतवादी हल्ल्याला दुर्घटना ठरवले आहे. पुलवामा दुर्घटनेनंतर भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकवर परदेशी प्रसारमाध्यमे शंका घेत आहेत. ज्यामुळे भारत सरकारच्या विश्वसनीयतेबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

पंतप्रधान मोदी तुमच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री ३०० दहशतवादी मारल्याचे सांगतात. भाजपा अध्यक्ष २५० दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचे सांगतात. योगी आदित्यनाथ ४०० तर तुमचे मंत्री अहलुवालिया एकही दहशतवादी मारला नाही असे सांगतात. तुम्ही यावर मौन बाळगले आहे. नेमकं खोटं कोण बोलतय ते देशाला कळलं पाहिजे असे दिग्विजय यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

हा राजकारण आणि सत्तेचा विषय नाही. बहिणीने तिचा भाऊ, आईने तिचा मुलगा तर पत्नीने तिचा पती गमावला आहे. या प्रश्नांची उत्तरे तुम्ही कधी देणार ? असा सवाल त्यांनी टि्वटमधून मोदींना विचारला आहे.

सैन्याच्या यशाला भाजपा आपले यश दाखवून निवडणुकीतील मुद्दा बनवण्याचा प्रयत्न करत आहे. हा आपल्या देशातील सैनिकांच्या शौर्याचा अपमान आहे. देशातील प्रत्येक नागरिक भारतीय सैन्य आणि सुरक्षा दलांचे सन्मान करतात असे दिग्विज यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pulwama terror attack an accident digvijaya singh
First published on: 05-03-2019 at 11:58 IST