एव्हरेस्ट शिखर सर केल्याचा दावा करणारे पुण्यातील पोलीस दाम्पत्य दिनेश आणि तारकेश्वरी राठोड या दोघांना पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आले आहे. या दाम्पत्याची खात्यांतर्गत चौकशी सुरु राहणार आहे. यापूर्वी त्यांच्यावर नेपाळमध्ये १० वर्षांसाठी प्रवेशबंदी टाकण्यात आली होती.

पुणे पोलीस दलात कार्यरत असलेले  दिनेश राठोड आणि तारकेश्वरी राठोड या दाम्पत्याने जूनमध्ये काठमांडूमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एव्हरेस्ट शिखर सर केल्याचा दावा केला होता. एव्हरेस्ट सर करणारे पहिले दाम्पत्य असल्याचे राठोड यांनी म्हटले होते. पुण्यात परतल्यानंतर राठोड दाम्पत्यावर कौतुकाचा वर्षाव होत होता. मात्र काही गिर्यारोहकांनी त्यांच्या एव्हरेस्ट मोहीमेविषयी शंका उपस्थित केल्या आणि यानंतर राठोड दाम्पत्याचे बिंग फुटले.

शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात नेमणुकीस असलेल्या राठोड दाम्पत्याने एव्हरेस्ट मोहिमेसाठी सुटी मिळावी, असा अर्ज पोलीस आयुक्तांकडे केला होता. एक एप्रिलपासून तारकेश्वरी आणि दिनेश राठोड हे सुटीवर गेले होते.  राठोड दाम्पत्याने २३ मे रोजी एव्हरेस्ट सर केल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले होते. एव्हरेस्टवर राष्ट्रध्वज फडकाविणारे छायाचित्र त्यांनी प्रसारमाध्यमांना दिले होते. त्या वेळी पुण्यातील गिर्यारोहक एव्हरेस्ट मोहिमेवर होते. राठोड दाम्पत्य एव्हरेस्टवर चढाई करताना त्यांच्या पाहण्यात आले नव्हते. त्यामुळे राठोड दाम्पत्याची कथित एव्हरेस्ट मोहीम संशयास्पद असल्याचे मत गिर्यारोहकांनी व्यक्त केले होते.

राठोड दाम्पत्याच्या एव्हरेस्ट मोहीमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यावर पुणे पोलिसांनीही या दोघांची चौकशी सुरु केली होती. नेपाळ सरकारनेही या दाम्पत्यावर १० वर्षांसाठी नेपाळमध्ये प्रवेश करण्यावर बंदी घातली होती. पुणे पोलिसांनी नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारे या दोघांवर आता निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या दोघांची खातेनिहाय चौकशी सुरुच राहील असे सूत्रांनी सांगितले.