Bouncer Of Security Agency: खाजगी सुरक्षा एजन्सी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी ‘बाउन्सर’ हा शब्द वापरत असल्याबद्दल चिंता व्यक्त करताना, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले आहे की, “या शब्दप्रयोगाचा उद्देश जनतेच्या मनात भीती, चिंता आणि दहशत निर्माण करणे आहे, जे कोणत्याही सुसंस्कृत व्यवस्थेत मान्य नाही.”

खाजगी सुरक्षा एजन्सी चालवणाऱ्या एका व्यक्तीने दाखल केलेल्या अटकपूर्व जामिनाच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. त्यावेळी न्यायालयाने असेही निरीक्षण नोंदवले की, “सुरक्षा एजन्सी किंवा सुरक्षा रक्षकांच्या सेवा घेण्याचे मुख्य कारण म्हणजे सुरक्षा आणि सुरक्षित वातावरण निश्चित करणे आहे. परंतु जेव्हा या सेवा देणारे किंवा त्यांचे कर्मचारीच वाईट गोष्टी करतात, स्वतःला घटनाबाह्य अधिकारी मानतात, धमक्या आणि क्रूर शक्तीचा शस्त्र म्हणून वापर करतात, तेव्हा ते समाजासाठी गंभीर चिंतेचे कारण बनते.”

सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती अनूप चित्कार यांच्या एक सदस्सीय खंडपीठाने असे निरीक्षण नोंदवले की, न्यायालयासाठी सर्वात मोठी चिंता याचिकाकर्ता चालवत असेलेल्या सुरक्षा एजन्सीच्या कर्मचाऱ्यांसाठी “बाउन्सर” या शब्दाचा वापर करणे ही आहे.

यावेळी खंडपीठाने या प्रकाराचा ‘त्रासदायक ट्रेंड’ म्हणून उल्लेख केला. याचबरोबर म्हटले की, “सुरक्षा एजन्सी चालवणारे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचा एक विशिष्ट वर्ग, साध्या “बाउन्सर” च्या नावाखाली “दहशत निर्माण करणारी आणि धमकावणारी भूमिका” स्वीकारू लागला आहे.”

राज्य सरकार असंवदनशील

या प्रकरणाच्या सुनावणी वेळी उच्च न्यायालयाने राज्य सरकारवही नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने म्हटले की, “राज्याला हे देखील माहिती आहे की सुरक्षा एजन्सी त्यांचा प्रभाव पाडण्यासाठी “बाउन्सर” हा शब्द कसा वापरत आहेत, परंतु राज्य सरकार अविचलित व बेफिकीर आहे आणि म्हणूनच अशा मुद्द्याबद्दल त्यांनी असंवेदनशील राहण्याचा पर्याय निवडला आहे.”

बाउन्सर शब्दाची व्याख्या

यावेळी न्यायालयाने शब्दकोशांमध्ये आढळणाऱ्या “बाउन्सर” या शब्दाची व्याख्या देखील उलगडली. मेरियम-वेबस्टरच्या मते, जी गोष्ट उसळते त्या बाउन्सर म्हणतात. तर, ऑक्सफर्ड शब्दकोशानुसार, बाउन्सर म्हणजे सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः बार किंवा नाईट क्लबमधून उसळत्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी नियुक्त केलेला व्यक्ती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंब्रिज शब्दकोशानुसार बाउन्सर म्हणजे अशी व्यक्ती ज्याचे काम बार, पार्टी इत्यादी बाहेर उभे राहणे आणि त्रास देणाऱ्या लोकांना आत येण्यापासून रोखणे किंवा त्यांना बाहेर काढणे हे असते, असे न्यायालयाने म्हटले आहे.