पंजाबचे आरोग्य मंत्री विजय सिंगला यांची भ्रष्टाचाराच्या आरोपावरून पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी हकालपट्टी केली होती. त्यानंतर काही वेळातच लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने सिंगला यांना अटक केली. आरोग्य मंत्री विजय सिंगला यांनी नोकरीचे कंत्राट देताना १ टक्का कमिशनची मागणी केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सिंगला यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप या अगोदरही करण्यात आला होता. आता त्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचे ठोस पुरावे मिळाल्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आपल्या मंत्रीमडळातून सिंगला यांची हकालपट्टी केली आहे. मान यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

पोलीस चौकशीची मागणी

मुख्यमंत्री भगवंत मान यांनी एक व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे, आम्ही एका पैशाचाही भ्रष्टाचार सहन करणार नाही. भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलनातून आमचा पक्ष (आप) उदयास आला आहे. या विश्वासावर खरे उतरण्याची जाबाबदारी आमच्यावर आहे. विजय सिंगला यांना मी मंत्रिमंडळातून काढून टाकत असून या प्रकरणाची पोलीस चौकशीची मागणीही केली आहे.

भ्रष्टाचार मुक्त पंजाब
पंजाबमध्ये पहिल्यांदाच एका मुख्यमंत्र्याने आपल्या मंत्र्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कारवाई केल्याची घटना घडली आहे. पंजाब विधानसभा निवडणूकीच्या वेळेस आम आदमी पक्षाने सत्ताधारी काँग्रेस पक्षावर भ्रष्टाचारावरून हल्लाबोल केला होता. तसेच पंजाबमध्ये जर आपचे सरकार आले तर भ्रष्टाचार मुळापासून उखडून काढू, असे वचनही अरविंद केजरीवाल यांनी दिले होते.