Who is Model Lishalliny Kanaran: हिंदू पुजाऱ्याने आशीर्वाद देण्याच्या नावाखाली चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप मलेशियन मॉडेलने केला आहे. मलेशियातील जिल्हा सेपांगमधील मरीअम्मन मंदिरात शनिवारी सदर घटना घडल्याचा उल्लेख मॉडेल लिशालिनी कनारनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सदर प्रकाराची माहिती दिली. साउथ चायना मॉर्निंग पोस्ट संकेतस्थळाने सदर वृत्त दिले आहे. मॉडेलची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाल्यानंतर आता पोलिसांनी कथित हिंदू पुजाऱ्याचा शोध सुरू केला आहे. लिशालिनी कनारनला २०२१ साली मिस ग्रँड मलेशिया या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करण्याआधी आपल्याला तपास अधिकाऱ्यांकडून धमकी दिली गेली, असाही आरोप कनारन हिने केला आहे. ‘तू जर सदर प्रकारची जाहीर वाच्यता केलीस, तर पुढे जे होईल, त्यासाठी तूच जबाबदार असशील’, अशी धमकी अधिकाऱ्याने दिल्याचा दावा कनारन हिने केला आहे. त्यानंतर तिने हा प्रकार सोशल मीडियाद्वारे उघड करण्याचा निर्णय घेतला.
लैंगिक अत्याचाराची माहिती देताना मॉडेलने म्हटेल, “मरीअम्मन मंदिरातील पुजारी मला धार्मिक विधी पार पाडण्यात मदत करत असतात. मला विधींबद्दल अधिक माहिती नसल्यामुळे मी त्यांची मदत घेत असते. त्यादिवशी मी प्रार्थना करत असताना ते माझ्याजवळ आले. त्यांच्याकडे पवित्र जल आणि हातावर बांधण्यासाठी पवित्र धागा असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्यावर कृपादृष्टी राहावी, यासाठी आशीर्वाद रुपी या वस्तू ते मला देऊ इच्छितात, असे त्यांनी सांगितले. यासाठी त्यांनी त्यांच्या खोलीत येण्याची विनंती केली. मला हे ठिक वाटत नव्हते, तरीही मी तिथे गेले.”
पुजाऱ्याच्या खोलीत गेल्यानंतर त्यांनी मला खाली बसण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी उग्र वास येणारे पाणी माझ्यावर शिंपडले. त्यांनी म्हटले की, हे पाणी त्यांनी भारतातून आणले आहे. सामान्य माणसांना ते अशाप्रकारचा आशीर्वाद देत नाहीत, असे पुजाऱ्याने सांगितल्याचे कनारन म्हणाली.
आणि त्याने चुकीच्या पद्धतीने हात लावला..
कनारनने पुढे म्हटले की, माझ्या चेहऱ्यावर पाणी शिंपडल्यानंतर मला डोळे उघडणे शक्य झाले नाही. त्यानंतर त्यांनी मला कपडे काढण्यास सांगितले. पण मी त्यासाठी नकार दिला. त्यांनी माझ्या तंग कपड्यांवर नाराजी व्यक्त केली आणि माझ्या मागे जाऊन उभे राहिले. त्यानंतर त्यांनी पुन्हा पाणी शिंपडले आणि माझ्या ब्लाऊजमध्ये हात घालून चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला.
“अचानक झालेल्या या कृतीमुळे मला धक्काच बसला. मी काहीच बोलू शकले नाही. मंदिरात हे सर्व चालले आहे या विचारानेच मला मोठा धक्का बसला होता. मंदिरात एक पुजारी माझा विनयभंग करेल, असे कधीही वाटले नव्हते”, अशी भावना कनारनने व्यक्त केली.
पोलिसांनी काय म्हटले?
मलेशियाच्या सेपांग जिल्हा पोलीस प्रमुखांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, कथित आरोपी हा भारतीय नागरिक असून मंदिरातील निवासी पुजाऱ्याच्या अनुपस्थित तो मंदिरातील कार्यभार सांभाळत होता. सशंयित आरोपी हा पीडितेच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर पवित्र पाणी शिंपडून विनयभंग करत होता, असे पीडितेने सांगितले आहे. आरोपीचा शोध सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले.