नेताजी सुभाषचंद्र बोस यांची हत्या करण्यात आली होती आणि याचे थेट कनेक्शन रशियासोबत असल्याचा दावा काही दिवसांपूर्वी भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. त्यानंतर पु्न्हा एकदा त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच पुतिन यांनी आमचे मित्र असल्याचा दाखला देण्यासाठी सुभाषचंद्र बोस आणि लाल बहादुर शास्त्री यांच्या मृत्युच्या फाइल्स सार्वजनिक कराव्यात अशी मागणीही त्यांनी केली आहे.

स्वामी म्हणाले, पुतिन यांना हे ही सांगावे लागेल की सोनिया गांधी त्यांना भेटण्यासाठी दोनदा रशियाला कशासाठी गेल्या होत्या. पुतिन यांना सोनिया गांधी आणि त्यांचे वडिल केजीबी एफीलिएशन्स कंपनीच्या संबंधांबद्दल माहिती द्यावी लागेल. सध्या पुतिन दोन्ही बाजूंनी भारताशी खेळत आहेत.

स्वामींनी यापूर्वी म्हटले होते की, आजवर मानले जात होते त्याप्रमाणे, १९४५ मध्ये विमान अपघातात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झाला नव्हता. तर त्यांच्या हत्येमध्ये रशियाचे माजी राष्ट्रपती जोसेफ स्टालिन यांचा सहभाग होता. बोस यांनी साम्यवादी रशियाकडे शरण मागितली होती. त्यानंतर तिथेच त्यांची हत्या करण्यात आली होती. बोस यांचा मृत्यू १९४५मध्ये झाला नव्हता, ही चुकीची समजूत आहे. त्यांच्या हत्येमध्ये पंडित नेहरू आणि जपान्यांचा कट होता.

त्याचबरोबर स्वामी यांनी हा देखील दावा केला होता की, नेताजींच्या आझाद हिंद सेनेमुळेच ब्रिटनच्या शासनकर्त्यांनी भारताला स्वातंत्र्य देणे भाग पडले होते. या आझाद हिंद सेनेची स्थापना ७५ वर्षांपूर्वी सिंगापूरमध्ये झाली होती.