नवी दिल्ली : देशाचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी. राधाकृष्णन यांनी शुक्रवारी शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राधाकृष्णन यांना शपथ दिली. सप्टेंबर २०३० पर्यंत त्यांचा कार्यकाळ असेल.

उपराष्ट्रपती पदाची शपथ घेण्यापूर्वी गुरुवारी राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला. धनखड यांच्या राजीनाम्यानंतर ५३ दिवसांनंतर शुक्रवारी नव्या उपराष्ट्रपतींनी पदाची सूत्रे हाती घेतली. शपथविधी समारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीयमंत्री राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी यांच्यासह केंद्र सरकारमधील वरिष्ठ मंत्री उपस्थित होते. याशिवाय, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू व हमीद अन्सारी आदी उपस्थित होते.

धनखड यांचीही उपस्थिती

प्रकृतीचे कारण देत पायउतार झालेले जगदीप धनखड हेही सी. पी. राधाकृष्णन यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थित होते. सत्ताधाऱ्यांशी झालेल्या मनभेदानंतर धनखड यांना पदावरून हटवले गेल्याचे मानले जाते. उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर धनखड पहिल्यांदाच सार्वजनिक समारंभामध्ये सहभागी झाले होते. धनखडांनी राधाकृष्णन यांचे ट्वीट करून अभिनंदन केले होते. शपथविधी समारंभ संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रपती मुर्मू यांच्या पाठोपाठ निघून गेले. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याशी हस्तांदोलन केले. पण, त्यांच्या शेजारी असलेल्या धनखड यांच्याकडे मात्र दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळाले.

राहुल गांधींच्या गैरहजेरीवरून टीका

राष्ट्रपती भवनामध्ये राज्यसभेतील विरोधीपक्षनेते मल्लिकार्जुन खरगे तसेच तृणमूल काँग्रेस व इतर विरोधी पक्षांचे नेते शपथविधी समारंभात सहभागी झाले होते. मात्र, लोकसभेतील विरोधीपक्षनेते राहुल गांधी मात्र कार्यक्रमाला गैरहजर राहिले. त्यावरून भाजपच्या नेत्यांनी राहुल गांधींवर टीका केली. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही मतचोरी झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता.

अजित पवारही अनुपस्थित

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शपथविधीसाठी उपस्थित राहिले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र सहभागी झाले नाहीत. महिला प्रशासकीय अधिकाऱ्याला दिलेल्या वागणुकीवरून अजित पवार विरोधकांचे लक्ष्य बनले होते. या मुद्द्याची चर्चा टाळण्यासाठी ते दिल्लीला आले नसल्याची चर्चा शुक्रवारी रंगली होती. या कार्यक्रमाला भाजपशासित राज्यांतील सर्व मुख्यमंत्री उपस्थित होते.