े
Radhika Yadav Murder Case : राधिका यादव या २५ वर्षीय टेनिसपटूच्या हत्येच्या प्रकरणात पोलिसांकडून तपास केला जात आहे. राधिकाची तिच्यात वडीलांनी घरात गोळ्या घालून हत्या केली असून आता पोलीस तिच्या आईला या हत्येबाबत कितपत माहिती होती याचा तपास करत आहेत.
या प्रकरणातील आरोपी दीपक यादवने पोलिसांच्या चौकशीत मुलीच्या हत्येची योजना बनवल्याचे कबूल केले आहे, इतकेच नाही तर मुलीला गोळ्या घालण्याच्या आधी त्याने मुलाला दूध घेऊन येण्यासाठी घराबाहेर पाठवलं होतं.
दरम्यान दीपक यादव याची पत्नी आणि पीडितेची आई मंजू यादव यांनी पोलिसांना जबाब देण्यास नकार दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, हत्येच्या वेळी ती फ्लॅटमध्ये उपस्थित होती, पण तिला ताप आला होता आणि तिने काहीही पाहिले नाही.
दरम्यान, पती दीपक यादव मुलीची हत्या करण्याची योजना आखत होता याबद्दल मंजू यांना कितपत माहिती होती, पोलीस या गोष्टीचा शोध घेत आहेत. पीडित राधिका यादव ही एक टेनिस अकादमी चालवत होती आणि ती बंद करावी अशी तिच्या वडीलांची इच्छा होती, मात्र तिने तसे करण्यास नकार दिला होता.
मुलीची हत्या का केली? याबद्दल आरोपीने काही खुलासा केला का याबद्दल पोलिसांकडून माहिती देण्यात आली. “त्याने अद्याप स्पष्ट कारण सांगितले नाही, त्याच्या पत्नीला काही माहिती होते का हेही स्पष्ट केले नाही- पण तिला काही प्रमाणात याबद्दल माहिती असावी असे दिसून येते,” असे गुरूग्राम पोलिसांचे पीआरओ संदीप कुमार यांनी सांगितले.
दीपक यादवला पोलीस कोठडी
या प्रकरणातील आरोपी दीपक यादवला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने पोलिसांना चौकशीसाठी वेळ मिळावा यासाठी यादवला एक दिवसाची कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने सांगितले की मुलगी जे काही करेल त्या सर्व गोष्टीत तिला पाठिंबा दिल्याने त्याच्या मूळ गावातील गावकरी त्याला टोमणे मारत होते. एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, गावकरी त्याला ‘गिरा हुआ बाप’ असेही म्हणत असत. या टोमण्यांमुळे दीपक यादव संतापला आणि त्याने राधिका यादवला तिची टेनिस अकादमी बंद करण्यास सांगितले, ज्यासाठी त्यानेच मुलीला पैसे दिले होते. पण राधिकाने ही अकादमी बंद करण्यास नकार दिला. यानंतर आरोपीने दोन पर्यायांचा विचार सुरू केला, एकतर आत्महत्या करावी किंवा मुलीची हत्या करावी.
अखेर गुरूवारी त्याने दुसरा पर्याय निवडला आणि राधिका नाश्ता करत असताना तिच्यावर चार गोळ्या झाडल्या, ज्यामुळे तिचा जागेवरच मृत्यू झाला.