Radhika Yadav Murder Case Update: हरियाणाची राज्यस्तरीय टेनिसपटू राधिका यादव (वय २५) हीची तिच्याच वडिलांनी अतिशय निर्घृणपणे गोळ्या झाडून हत्या केली. हरियाणाच्या गुरुग्राममधील राहत्या घरी राधिका यादववर गुरुवारी सकाळी पाच गोळ्या झाडण्यात आल्या. त्यापैकी तीन गोळ्या लागून राधिकाचा मृत्यू झाला. राधिका यादवचा सोशल मीडियावरील वावर तिच्या वडिलांना फारसा रुचला नव्हता, असे सांगितले जात आहे. तसेच राधिका यादवच्या गावातील लोकप्रिय इन्फ्लुएन्सर एल्विश यादवप्रमाणे राधिकालाही कटेंट क्रिएटर व्हायचे होते, अशी नवी माहिती आता समोर आली आहे.
अतिरिक्त पोलीस आयुक्त यशवंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, राधिकाचे वडील दीपक यादव यांनी मुलीच्या टेनिस प्रशिक्षणावर अडीच कोटी खर्च केले होते. मात्र मुलीने टेनिस सोडण्याचा विचार सुरू केल्यानंतर ते मानसिक तणावात होते. तसेच सामाजिक दबावामुळे त्यांनी मुलीचा खून केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
इंडिया टुडेने सूत्रांच्या मदतीने याबाबतचे वृत्त दिले आहे. टेनिस सोडल्यानंतर राधिकाने वडिलांशी संवाद साधत त्यांची मेहनत फुकट जाऊ देणार नसल्याचे म्हटले होते. “पप्पा, माझ्या डोक्यात काही कल्पना आहेत. मी आजवर पुरेसा खेळ सादर केलेला आहे. आता मी पैसे कमविण्यावर भर देणार आहे”, दुखापतीनंतर खेळापासून बाजूला झाल्यानंतर राधिकाने या शब्दांत वडिलांची समजूत घातली होती.
एल्विश यादव याच्याप्रमाणे आपणही प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर होऊ, असे राधिका यादवचे स्वप्न होते. राधिकाने आई बरोबर काही रिल्स केले होते. कुटुंबाची मान शरमेने खाली जाईल, असे कोणतेही काम करणार नाही, असाही शब्द राधिकाने कुटुंबियांना दिला होता.
दरम्यान राधिका यादवचे सोशल मीडिया हँडल्स डिलीट करण्यात आले आहेत. कुटुंबातीलच कुणी अकाऊंट डिलीट केले का? याचा तपास पोलीस करत आहेत, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त यशवंत यांनी सांगितले. तसेच राधिका कोणताही निर्णय कुटुंबियांना सांगूनच घेत असे.
मुलीच्या कमाईवर जगत असल्याचे टोमणे गावातील काही लोक मारत असल्यामुळे वडील दीपक यादव तणावात होते, असेही सांगितले जात आहे. गुन्हा करण्यापूर्वी काही दिवसांपासून दीपक यादव मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होते, असेही पोलिसांनी सांगितले आहे.
कोण होती राधिका यादव?
२३ मार्च २००० साली जन्मलेली राधिका ही प्रतिभावान टेनिसपटू होती आणि तिची इंटरनॅशनल टेनिस फेडरेशन (ITF) मध्ये दुहेरी टेनिस खेळाडू म्हणून ११३वी रँक होती. आयटीएफ डबल्समध्ये देखील टॉप दोनशे खेळाडूंमध्ये तिचा क्रमांक होता.