राफेल लढाऊ जेट विमानांच्या खरेदी प्रकरणी फ्रान्सच्या एका वृत्तपत्राने या करारासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. फ्रान्सच्या मीडियापार्ट या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार दसॉल्त एव्हिएशन या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी २०१७ मधील बैठकीत या करारात रिलायन्सची निवड करणे ही अट होती, असा खुलासा केला होता.

राफेल विमान व्यवहारात रिलायन्स डिफेन्स कंपनीची निवड करण्यावरुन वाद निर्माण झाला आहे. या प्रकल्पात रिलायन्सचे नाव भारतानेच सुचवले होते, असा दावा फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष ओलांद यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. यावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण देताना असे म्हटले होते की ‘दसॉल्त एव्हिएशन’ या कंपनीनेच रिलायन्सची निवड केली आहे. हे प्रकरण ताजे असतानाच फ्रान्सच्या मीडियापार्ट या वृत्तपत्राने आता नवा खुलासा केला आहे. मीडियापार्ट या वृत्तपत्राने ‘दसॉल्त’ची अंतर्गत कागदपत्रे मिळवली आहे. कंपनीच्या डेप्यूटी सीईओंनी ११ मे २०१७ मध्ये दसॉल्त रिलायन्स एरोस्पेस लिमिटेडच्या बैठकीत म्हटले होते की, दसॉल्त एव्हिएशनला भारतासोबत हा करार व्हावा यासाठी सर्व अटींची पूर्तता करणे बंधनकारक होते. रिलायन्सची निवड हा यातीलच एक भाग होता, असे त्यांनी म्हटले होते.

मेक इन इंडिया धोरणानुसार दसॉल्त एव्हिएशनने भारतातील रिलायन्स समुहाशी भागीदारी करण्याचा निर्णय घेतला आणि दसॉल्तनेच ही निवड केल्याचा दावा कंपनीच्या सीईओंनी एका मुलाखतीत केला होता.

दरम्यान, बुधवारी या खरेदीबाबत निर्णय प्रक्रियेचा तपशील लखोटाबंद पाकिटात सादर करावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे या मुद्द्यावर ताठर भूमिका घेणाऱ्या सरकारलाही आता तपशील सादर करावा लागेल. काँग्रेसने सत्ताधारी एनडीए सरकारला खिंडीत गाठले असतानाच, या घडामोडी घडल्याने भाजपा सरकारची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत.