नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजुरा व कर्नाटकातील आळंद विधानसभा मतदारसंघांतील मतदारयाद्यांतून मतदारांना ऑनलाइन सॉफ्टवेअरचा वापर करून अत्यंत पद्धतशीरपणे वगळले गेल्याचा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. लोकशाही आणि मतदान प्रक्रिया उद्ध्वस्त करणाऱ्यांना केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार संरक्षण देत असल्याचा थेट आरोपही त्यांनी केला. निवडणूक आयोगाने मात्र तातडीने निवेदन जारी करत राहुल यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

बिहारमधील मतदार पुनरीक्षण प्रक्रियेसह लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील मतदान प्रक्रियेबद्दल सातत्याने आरोप करताना राहुल गांधी यांनी आरोपांचा ‘हायड्रोजन बॉम्ब’ लवकरच फोडणार असल्याचा दावा केला होता. मात्र, गुरुवारी केलेले आरोप हा ‘हायड्रोजन बॉम्ब’ नसून तो अद्याप बाकी आहे, असे सांगत भविष्यात याप्रश्नी निवडणूक आयोग, केंद्र सरकार आणि भाजपला आणखी घेरण्याचे स्पष्ट संकेत राहुल यांनी दिले.

सॉफ्टवेअर आणि ऑनलाइन पद्धतीने कर्नाटकमध्ये २०२३च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आळंद मतदारसंघातील ६ हजार १८ मते रद्दबातल केली गेली. तर, महाराष्ट्रात २०२५च्या विधानसभा मतदारसंघामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघामध्ये ६ हजार ८५० मते मतदार याद्यांमध्ये नव्याने समाविष्ट केली गेली. राहुल गांधींनी ज्ञानेश कुमार यांचे नाव घेऊन पहिल्यांदाच मतचोरीच्या घोटाळ्यात केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सहभागी असल्याचा आरोप केला. कर्नाटकच्या सीआयडीने या गैरप्रकाराची चौकशी सुरू केली, यासंदर्भात १८ महिन्यांमध्ये १८ वेळा ज्ञानेशकुमार यांच्याकडे मतदार वगळल्याचा तपशील मागितला पण, आयोगाने तो अजूनही दिलेला नाही. हा माहिती-विदा दिला गेला तर आयोगाचा मतचोरीच्या घोटाळ्यातील सहभाग उघड होईल, असा दावा राहुल यांनी केला.

ज्ञानेश कुमार लक्ष्य

मतदार वगळण्याचा हा ऑनलाइन घोटाळ्याची पूर्ण माहिती केंद्रीय मुख्य निवडणूक ज्ञानेश कुमार यांना असली तरी ते मतचोरांविरोधात कारवाई करत नाहीत. ज्ञानेश कुमार लोकशाहीची हत्या करत आहेत. सीआयडीला माहिती न देऊन ते लोकशाहीच्या मारेकऱ्यांना वाचवत आहेत. पण, हे प्रकार फार काळ चालणार नाहीत. आता तर केंद्रीय निवडणूक आयोगातूनच काँग्रेसला मदत मिळू लागली आहे. आयोगाच्या घोटाळ्यांची माहिती जसजशी लोकांना कळू लागेल तसे लोक हे मतचोरीचे गैरप्रकार रोखतील, असे राहुल गांधी म्हणाले.

आयोगाचा इन्कार

केंद्रीय निवडणूक आयोगाने राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे व असत्य असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. राहुल गांधी लोकांची दिशाभूल करत आहेत. कोणत्याही नागरिकाकडून ऑनलाइन कोणत्याही मतदाराला वगळता येत नाही. मतदारयादीतून नाव वगळले गेलेल्या व्यक्तीला आपले म्हणणे मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतेही नाव हटवले जात नाही. २०२३ मध्ये, आळंद विधानसभा मतदारसंघात काही मतदारांची नावे वगळण्याचे प्रयत्न झाले पण, ते अपयशी ठरले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनीच गुन्हा दाखल केला होता, असेही आयोगाने निवेदनात म्हटले आहे. याठिकाणी २०२३मध्ये काँग्रेसचा उमेदवार विजयी झाल्याकडेही आयोगाने लक्ष वेधले आहे.

आरोप काय?

संघटितपणे, सॉफ्टवेअरचा वापर करून मतदार याद्यांमध्ये फेरफार केला गेला.

या गैरप्रकाराची केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना माहिती

कर्नाटक सीआयडी चौकशी करत असली तरी ज्ञानेश कुमार माहिती-विदा देत नाहीत.

आपल्या मोबाइलचा गैरवापर मतदार वगळण्याचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी केला गेल्यापासून लोक अनभिज्ञ.

कर्नाटकमध्ये ६ हजार मतदार वगळले गेले तर, महाराष्ट्रात नव्या मतदारांना समावेश केला गेला.

माझे काम लोकशाहीचे संरक्षण करण्याचे नसून लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचे आहे. लोकशाही प्रक्रिया सुरक्षित ठेवण्याचे कर्तव्य इतर घटनात्मक संस्थांनी केले पाहिजे पण, त्या हे काम करत नसल्यामुळे मला हे काम करावे लागत आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून मी सांगू इच्छितो की, मतचोरी झाली हे मी १०० टक्के पुराव्यानिशी दाखवलेले आहे. – राहुल गांधी, विरोधी पक्षनेते