काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी इस्राईलच्या एनएसओ कंपनीच्या पेगसेस स्पायवेअरचा (Pegasus Spyware) वापर करून हेरगिरी केल्याप्रकरणी मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. “मोदी सरकारने विरोधी पक्ष, सैन्य, न्यायपालिका सर्वांना लक्ष्य केलंय. हा देशद्रोह आहे. मोदी सरकारने देशद्रोह केलाय,” असं मत राहुल गांधींनी व्यक्त केलं. त्यांनी ट्वीट करत आपली प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राहुल गांधी म्हणाले, “मोदी सरकारने आपल्या लोकशाहीच्या प्रमुख संस्था, राजकीय नेते आणि जनतेची हेरगिरी करण्यासाठी पेगसेस स्पायवेअर खरेदी केलं होतं. फोन टॅप करून सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्ष, सैन्य, न्यायपालिका सर्वांना लक्ष्य केलंय. हा देशद्रोह आहे. मोदी सरकारने देशद्रोह केलाय.”

नेमकं प्रकरण काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी जुलै २०१७ मध्ये इस्राईल दौऱ्यावर गेले तेव्हा भारताने इस्राईलसोबत २ बिलियनचा शस्त्रास्त्र करार केला. यात क्षेपणास्त्र यंत्रणेसह पेगसेस स्पायवेअरचा देखील समावेश असल्याचं न्यू यार्क टाईम्सच्या अहवालात म्हटलं आहे. विशेष म्हणजे इस्राईलला भेट देणारे मोदी पहिले भारतीय पंतप्रधान ठरले होते. भारताचं आंतरराष्ट्रीय पातळीवर विशिष्ट पॅलेस्टाईन धोरण असूनही ही भेट झाली होती.

या इस्राईल दौऱ्यात पंतप्रधान मोदी आणि तत्कालीन इस्राईल पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्यात २ बिलियनच्या शस्त्रस्त्र खरेदीचा करार झाला. यातच क्षेपणास्त्र यंत्रणेसोबत पेगसेसचा समावेश होता. यानंतर नेत्यान्याहू यांनी जून २०१९ मध्ये भारत दौरा केला. यानंतर भारताने संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेत पॅलेस्टाईन मानवाधिकार संघटनेच्या मान्यतेवर इस्राईलच्या बाजूने मतदान केलं. आतापर्यंत भारत किंवा इस्राईलपैकी कोणीही पेगसेस खरेदीला अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही.

जगभरात कोणत्या देशांनी पेगसेस स्पायवेअर खरेदी केले?

इस्राईल संरक्षण मंत्रालयाच्या परवानगीने हे पेगसेस स्पायवेअर अमेरिकेसह भारत, मेक्सिको, पोलंड, हंगेरी आणि इतर अनेक देशांना विकण्यात आलं होतं. यापैकी अमेरिकेच्या एफबीआय तपास संस्थेने पेगसेस खरेदी करत त्याची चाचणी केली. मात्र, मागील वर्षी (२०२१) हे स्पायवेअर न वापरण्याचा निर्णय घेतला.

पेगॅससचा वापर करून कुणावर हेरगिरी केल्याचा आरोप

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात पेगॅसस हेरगिरी प्रकरणाची न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र चौकशी व्हावी या मागणीसाठी ५ ऑगस्ट २०२१ रोजी काही खटले दाखल झाले आहेत. याच खटल्यांची सामूहिक सुनावणी करताना न्यायालयाने आता तज्ज्ञांच्या समितीमार्फत तपास करण्याचा निर्णय घेतलाय.

हेही वाचा : Pegasus Row Live : मोदी सरकारचं खोटं बोलणं पकडलं गेलं, सर्वोच्च न्यायालयाचीही दिशाभूल : मल्लिकार्जून खरगे

३० जुलै २०२१ रोजी याचिकाकर्त्यांच्या वतीने बाजू मांडताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी या पेगॅसस हेरगिरीप्रकरणाचे व्यापक परिणाम असू शकतात असं सांगितलं. यावर सरन्यायाधीश रमण यांनी हा युक्तीवाद मान्य करत या खटल्यांची सुनावणी आवश्यक असल्याचं निरिक्षण नोंदवलं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi allege modi govt has committed treason in pegasus spyware pbs
First published on: 29-01-2022 at 17:21 IST