निवडणूक आयोग भाजपसाठी मतांची चोरी करीत असल्याचा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला. तसेच पुरावे असल्याचा दावा करीत त्यांनी पुराव्यांची तुलना ‘अणुबॉम्ब’शी केली. ज्या वेळी याचा स्फोट होईल त्या वेळी निवडणूक आयोगाला देशात लपण्यासाठीही जागा राहणार नाही, असेही ते म्हणाले. दरम्यान, यामध्ये सहभागी असलेल्या सर्वांनी देशद्रोह केला असून त्यांना सोडणार नसल्याचा इशारा देखील राहुल गांधी संसद भवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना दिला.
निवडणूक आयोगाने शुक्रवारी बिहारसाठी प्रारूप मतदार यादी प्रकाशित केल्यानंतर राहुल गांधी यांनी ही टिप्पणी केली. बिहारमध्ये मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा निवडणूक आयोगाचा हेतू असल्याचा आरोप करून, विरोधी पक्ष संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष सखोल फेरनिरीक्षणच्या (एसआयआर) मुद्द्यावर चर्चेची मागणी करीत आहे.
आरोपांकडे दुर्लक्ष करा
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेले ‘मतचोरी’चे आरोप निराधार असून अशा ‘बेजबाबदार’ टिप्पण्यांकडे दुर्लक्ष केले पाहिजे, असे निवडणूक आयोगाने शुक्रवारी म्हटले. तसेच दररोज मिळणाऱ्या धमक्यांना न जुमानता निवडणूक अधिकाऱ्यांनी निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने काम करावे, असेही आयोगाने म्हटले आहे.
काँग्रेसला २०२३ च्या मध्य प्रदेशातील निवडणुकीत त्यानंतर गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत अनियमिततेचा संशय होता. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत मतदार जोडण्यात आले. आम्हाला वाटते की, राज्य पातळीवर (महाराष्ट्रात) मतांची चोरी झाली आहे. आम्ही चौकशी सुरू केली. त्यास सहा महिने लागले. आम्हाला जे आढळले तो अणुबॉम्ब आहे. स्फोट होईल तेव्हा निवडणूक आयोगाला देशात लपण्यासाठीही जागा मिळणार नाही. – राहुल गांधी, विरोधी पक्षनेते, लोकसभा
पाण्यासारखे वाहा, बॉम्बसारखे फुटू नका. त्यांनी जर बॉम्ब फोडला तर तर आम्ही संविधान वाचवू. त्यांचे काम स्फोट करणे आहे. त्यांना दुसरे काही करायचे नाही. विरोधी पक्ष लोकशाहीवर विश्वास नसल्यामुळे असे बोलतात. राहुल गांधी यांची भाषाच अशोभनीय आहे. – संबित पात्रा, प्रवक्ते, भाजप