अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय संघ २००३ साली झालेल्या पराभवाची परतफेड करेल, अशी भारतीयांची अपेक्षा होती. पण, १० सामने जिंकूनही अंतिम फेरीत पोहचलेला भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. अंतिम सामन्यात भारतीय संघाने २४० धावा केल्या होत्या. त्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने ४३ षटकात ४ विकेट गमावत २४१ धावा केल्या आणि भारताला पराभवाचा सामना करावा लागला.

यामुळे १४० कोटी भारतीयांचं स्वप्न भंगलं आहे. यानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी भारतीय संघाचं कौतुक करत ऑस्ट्रेलियन संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘एक्स’ अकाउंटवर राहुल गांधी म्हणाले, “संपूर्ण विश्वचषकात भारतीय संघाने उत्तम कामगिरी केली आहे. विजय किंवा पराभव होऊ… आम्ही तुमच्यावर प्रेम करत राहणार… पुढील विश्वषचक आपण जिंकू… तसेच, विश्वषचकातील विजयाबद्दल ऑस्ट्रेलियाला शुभेच्छा.”

“भारतीय संघाने कठोर परिश्रम घेतले”

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही खेळाडूंचं कौतुक केलं आहे. ‘एक्स’ अकाउंटवर अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं, “भारतीय संघाला जरी विश्वचषक स्पर्धेत विजय मिळाला नाही. तरी, विश्वषचक स्पर्धेतील त्यांचा प्रवास असामान्य नव्हता. भारतीय संघाने कठोर परिश्रम घेतले आणि संघर्ष केला. विश्वषचषकात उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल सर्व खेळाडुंचे अभिनंदन.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आम्ही तुमच्याबरोबर उभे आहोत”

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘एक्स’ अकाउंटवर म्हणाले, “प्रिय टीम इंडिया… तुम्ही संपूर्ण विश्वचषकात केलेली कामगिरी उल्लेखनीय होती. तुम्ही तुमच्या खेळात सर्वोत्तम स्पिरीट दाखवलंत. तुम्ही देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी केली. आम्ही तुमच्याबरोबर उभे आहोत. आज आणि कायम.”