राहुल गांधींची जळजळीत टीका
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीने म. गांधीजींची हत्या केली, त्याच विचारसरणीशी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची नाळ जोडली गेल्याची टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. इतकेच नव्हे तर मोदी यांनी गुजरातच्या विकासाच्या केलेल्या दाव्याचीही गांधी यांनी खिल्ली  उडविली.
नरेंद्र मोदी यांचे पूर्ण जीवन  रा. स्व. संघाशी जोडले गेलेले आहे आणि त्यांना म. गांधीजी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारसरणीशी काहीही देणेघेणे नाही. संघाच्या विचारसरणीने म. गांधीजींची हत्या केली आणि सरदार पटेल यांनी त्यानंतर त्या संघटनेवर बंदी घालण्याचे प्रस्तावित केले होते, असेही राहुल गांधी म्हणाले. येथे एका जाहीर सभेत ते बोलत होते.
सरदार पटेल यांचा पुतळा उभारून त्यांचा वारसा चालविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावा मोदी करीत असल्याबद्दल गांधी यांनी त्यांच्यावर टीका केली. संघाची विचारसरणी विषारी असून त्यामुळे भारताचा आत्मा नष्ट  होईल, असे पटेल यांनी म्हटल्याकडे गांधी यांनी लक्ष वेधले. भाजपच्या नेत्यांना पटेल यांची विचारसरणी काय होती ते माहिती नाही, त्यांच्याबद्दल त्यांनी काहीही वाचलेले नाही, त्यांना कधीही समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि तोच भाजप आता पटेल यांचा पुतळा उभारत आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.
मोदी गुजरातच्या विकासाच्या आणि भ्रष्टाचाराच्या गप्पा मारतात, भाजपचे नेते देशभर दौरे करून सगळीकडे भ्रष्टाचार असल्याचे आरोप करतात, मात्र त्यांना गुजरातमधील भ्रष्टाचार दिसत नाही का, असा सवालही त्यांनी केला. गुजरातमध्ये कलंकित मंत्री किती आहेत, असा प्रश्न त्यांनी करताच, उपस्थितांनी तीन असे ओरडून सांगितले. भ्रष्टाचाराच्या उच्चाटनासाठी केंद्राने माहिती अधिकार कायदा आणि लोकपाल विधेयक आणले, मात्र भ्रष्टाचारविरोधी सहा कायद्यांना मंजुरी मिळण्यासाठी भाजप असहकार्य करते, असा आरोपही त्यांनी केला.

‘चहावाला’वर पडदा टाकण्याचे प्रयत्न
काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना ‘चहावाला’ हिणवल्याने निर्माण झालेल्या वादावर राहुल गांधी यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. जे इतरांना मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करतात त्यांना वगळून केवळ चहावालाच नव्हे तर कोणताही व्यवसाय करणाऱ्यांबाबत आदराची भावनाच ठेवली पाहिजे, असे ते म्हणाले. उदरनिर्वाहासाठी अनेक जण अनेक व्यवसाय करतात, काही जण चहा विकतात, काही टॅक्सी चालवितात, काही जण शेती करतात, त्या सर्वाचाच आदर केला पाहिजे. मात्र जे दुसऱ्यांना मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करतात त्यांचा आदर करू नये, असेही गांधी म्हणाले.