सासाराम (बिहार) : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजपने देशभरात निवडणुकांचे घोटाळे केले असून या ‘मतचोरां’ना केंद्र आणि बिहारच्या सत्तेतून खाली खेचा, असे आवाहन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह ‘महागठबंधन’च्या नेत्यांनी रविवारी केले. काँग्रेसच्या ‘व्होटर अधिकार यात्रे’ला सुरुवात करताना सासाराम येथील जाहीर सभेतून विरोधकांनी सत्ताधारी भाजप-संयुक्त जनता दल आघाडीविरोधात रणशिंग फुंकले.

एकीकडे केंद्रीय निवडणूक आयोग नवी दिल्लीमध्ये राहुल गांधींनी केलेल्या मतांच्या चोरीच्या आरोपाविरोधात स्पष्टीकरण देत असतानाच, रविवारी विरोधकांनी आयोग व भाजपवर हल्लाबोल केला. सभेला गांधी यांच्यासह राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव, बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव आणि ‘महागठबंधन’मधील सर्व घटक पक्षांचे नेते सहभागी झाले.

सभेतून भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. ‘बिहारमधून चोरांना हटवा, भाजपला हरवा’, असा नारा लालूप्रसाद यांनी दिला. ‘‘बिहारमधील निवडणूक भाजप विरोधात एकजुटीने लढवली पाहिजे. त्यासाठी राहुल आणि तेजस्वी यांच्या पाठीशी उभे राहा. देशातील लोकशाही टिकवण्यासाठी भाजपला सत्तेतून फेकून द्या,’’ असे आवाहन त्यांनी केले.

बिहार निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून मतचोरी व संविधान बचाओ या दोन मुद्द्यांना प्रचारात प्राधान्य दिले जाईल, हे राहुल गांधींच्या भाषणातून स्पष्ट झाले. महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने मतांची चोरी केली. बनावट मतदारांचा समावेश केला गेला, या नव्या मतदारांच्या मदतीने भाजपने जागा जिंकल्या, असा आरोप राहुल गांधींनी केला. बिहारमध्ये निवडणूक आयोग मतदारांची फेरतपासणी करून विधानसभा निवडणुकीची चोरी करत असल्याची टीका त्यांनी केली. बिहारची निवडणूक ही संविधान बचावासाठी होणारी लढाई आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजप संविधान नष्ट करत आहेत, असा आरोप गांधींनी केला. तर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. ‘‘पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून संघाचे कौतुक केले. संघ जगातील सर्वांत मोठी स्वयंसेवी संस्था असल्याचे मोदी म्हणाले. जे ब्रिटिशांकडे नोकरी मागत होते, ज्यांनी कधी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला नाही, त्यांचे कौतुक केले जात आहे. संघ, मोदी हे देशासाठी अत्यंत धोकादायक आहेत, त्यांना सत्तेवरून खाली खेचा,’’ अशा शब्दांत खरगेंनी प्रहार केला.

तेजस्वी यादव यांनीही भाजपवर टीका करताना केंद्रीय निवडणूक आयोग मतांची चोरी नव्हे तर मतांचा दरोडा टाकत आहे, असा आरोप केला. मताचा अधिकार हा मागास, गोरगरिबांचे अधिकार असून तो हिरावून घेतला जात आहे. लोकशाही संपवण्याचा घाट घातला जात असून महागठबंधन हे होऊ देणार नाही, ही ताकद फक्त बिहारमध्ये आहे, असे ते म्हणाले. काँग्रेसची ही ‘व्होटर अधिकार यात्रा’ १६ दिवस चालणार असून २३ जिल्ह्यांतील ५०हून अधिक विधानसभा मतदारसंघांतून ती प्रवास करेल. रविवारी पहिल्या दिवशी औरंगाबादमध्येही जाहीर सभा झाली.

लागल लागल झुलनिया…

राजदचे प्रमुख लालूप्रसाद आजारी असतानाही सभेला उपस्थित राहिले. अवघ्या ३-४ मिनिटांच्या भाषणात त्यांनी सभेचा नूर पालटून टाकला. ‘‘लागल लागल झुलनिया में धक्का, बलम कलकत्ता चलन….’’ या त्यांच्या ओळीवर अनेक मिनिटे टाळ्यांचा कडकडाट झाला. या ओळीचा मथितार्थ असा की, भाजप आणि जेडीयूला असा धक्का द्या, की ते पुन्हा कधीच सत्तेवर येता कामा नयेत!

बिहारमधील गरीब, कमजोर, मागास, अल्पसंख्याक लोकांची नावे मतदार यादीतून काढली जात आहेत. नवे मतदार समाविष्ट केले जात आहेत. महाराष्ट्र, कर्नाटकप्रमाणे बिहारमधील निवडणूक चोरली जाईल पण आम्ही ही चोरी रोखू. राहुल गांधीकाँग्रेसचे नेते