Rahul Gandhi challenges PM Modi over Donald Trump ceasefire claim : बिहार विधानसभा निवडणूक जवळ येत असल्याने येथे राजकीय पक्षांचा प्रचार शिगेला पोहचला आहे. यादरम्यान बिहारमध्ये एका प्रचार सभेत बोलताना राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे वारंवार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पेटलेला संघर्ष आपण थांबवला असल्याचे सांगत आले आहेत. दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यांनी या मुद्द्यावरू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. आपण भारत-पाकिस्तान संघर्ष थांबवला या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यावर त्यांन जाब विचारण्याची ‘हिंमत’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात नाही, असे राहुल गांधी गुरूवारी म्हणाले आहेत.

बिहारमधील नालंदा आणि शेखपुरा येथील रॅलींना संबोधित करताना राहुल गांधी यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यांनी बिहारमधील पेपरफुटी आणि खराब आरोग्य सेवांचा मुद्दा उपस्थित केला. पुढे बोलताना राहुल गांधींनी पंतप्रधानांना ळक्ष्य केले “मोदी यांनी अमेरिकेला भेट देणे अपेक्षित होते…. पण ते जात नाहीयेत कारण त्यांना ट्रम्प यांची भीती वाटते” असा आरोप राहुल गांधी यांनी केला. ते पुढे म्हणाले की, “जर पंतप्रधानांमध्ये हिंमत असेल, तर त्यांनी सांगावे की ट्रम्प यांनी ऑपरेशन सिंदूर थांबवले नाही.”

राहुल गांधी म्हणाले की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी हे एका धाडसी नेत्याचे उदाहरण होत्या. “जर तुम्हाला पंतप्रधान कसा असावा हे समजून घ्यायचे असेल तर तुम्ही इंदिरा गांधींनी १९७१ साली काय केले होते ते पाहावे, जेव्हा त्यांनी तात्कालीन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना सांगितले होते की, आम्ही तुम्हाला घाबरत नाहीत,” असेही राहुल गांधी म्हणाले. मोदींचे जवळचे उद्योग बिहारच्या तरुणांना नोकऱ्या देऊ शकत नाहीत असेही त्यांनी सुनावले.

बिहार निवडणूक प्रक्रिया

बिहारच्या सध्याच्या विधानसभेची मुदत येत्या २२ नोव्हेंबरला संपत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाला २२ नोव्हेंबरपूर्वी निवडणूक घ्यायची आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने येत्या नोव्हेंबर महिन्यात बिहारची विधानसभा निवडणूक घेण्याचं ठरवलं आहे. ही निवडणूक दोन टप्प्यांमध्ये पार पडेल. तर, १४ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. ६ नोव्हेंबर (गुरुवार) व ११ नोव्हेंबर (मंगळवार) रोजी पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया राबवली जाईल. तर, १४ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. १६ नोव्हेंबरआधी निवडणुकीची सगळी प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी १० ते १७ ऑक्टोबरदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. तर, दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी १३ ते २० ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. १८ ऑक्टोबरपर्यंत पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्जांची पडताळणी केली जाईल. तर २१ ऑक्टोबरपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्जांची पडताळणी पार पडेल. पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी २० ऑक्टोबर तर, दुसऱ्या टप्प्यातील अर्ज मागे घेण्यासाठी २३ ऑक्टोबर ही अंतिम तारीख असेल.