गेल्या काही महिन्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यानंतर दिवाळीच्या आदल्या दिवशी केंद्रानं एक्साईज ड्युटी कमी केल्याची घोषणा केली. त्यामुळे ४ ते ७ रुपयांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये घट झाल्याचं दिसून आलं. मात्र, एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या किंमती काहीशा कमी झाल्या असताना दुसरीकडे घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या दरांच्या बाबतीत मात्र सामान्यांना अद्याप कोणताही दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे सामान्यांना महागाईचा मनस्ताप सहन करावा लागत असताना यावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे.

राहुल गांधींनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून जनसत्ताची एक बातमी ट्वीट केली आहे. हे एका सर्वेक्षणाचं वृत्त असून त्यानुसार, घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्यामुळे तब्बल ४२ टक्के लोकांनी गॅसचा वापर करणं बंद केल्याचं समोर आलं आहे. या लोकांनी पुन्हा एकदा लाकडी इंधनाचा वापर करून चुलीवर स्वयंपाक करायला सुरुवात केल्याचा निष्कर्ष या सर्वेक्षणातून समोर आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या वृत्ताचा स्क्रीनशॉट शेअर करून राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. “विकासाच्या आश्वासनांपासून कित्येक मैल दूर असलेल्या लाखो परिवारांवर पुन्हा चूल फुंकण्याची वेळ ओढवली आहे. मोदीजींच्या विकासाची गाडी रिवर्स गियरमध्ये आहे आणि त्या गाडीचे ब्रेक देखील फेल आहेत”, असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे.