नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेतील बोस्टनमध्ये भारतीय समूहासमोर भाषण देताना, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा शंका घेतली. केंद्रीय निवडणूक आयोग निवडणूक प्रक्रिया पार पाडताना ह्यतडजोडह्ण करत असून आयोगाच्या संपूर्ण व्यवस्थेमध्येच घोळ आहे, असे ताशेरे राहुल गांधी यांनी मारले. परदेशात जाऊन राहुल गांधी भारतीय यंत्रणांवर आक्षेप घेत असल्याने भाजपने टीकास्त्र सोडले.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक बाबींमध्ये घोटाळा झाल्याचा मुद्दा राहुल गांधींनी अधोरेखित केला. महाराष्ट्रातील मतदारयाद्यांमध्ये त्रुटी आहेत. राज्यात प्रौढ लोकसंख्येपेक्षा पात्र मतदारांची संख्या जास्त होती. पाच वर्षांत ३२ लाख मतदार वाढले पण, विधानसभा निवडणुकीच्या आधी पाच महिन्यांमध्ये ३९ लाख मतदार वाढले. वाढीव मतदारांचे प्रमाण इतके प्रचंड कसे असू शकते, याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे विचारणा केली होती.

यासंदर्भातील संपूर्ण माहिती-विदा मागितला होता, असे राहुल गांधींचे म्हणणे होते. राहुल गांधींनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या कथित अफरातफरीचा मुद्दा यापूर्वी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन तसेच, लोकसभेतही मांडला होता. मात्र, बोस्टनमध्ये राहुल गांधींनी हाच मुद्दा पुन्हा मांडल्याने भाजपने राहुल गांधींविरोधात सोमवारी आगपाखड केली.

भाजपची टीका

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा परदेशात जाऊन भारतातील यंत्रणांवर उघडपणे टीका केल्याने भाजपने त्यांच्या विधानांवर आक्षेप घेतला. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते व लोकसभेतील खासदार संबित पात्रा यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत राहुल गांधींवर टीका केली. लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजपने केवळ ९ जागा तर काँग्रेसने १३ जिंकल्या होत्या

दोन तासांत ६५ लाख मतदान कसे?

राहल गांधी म्हणाले की, महाराष्ट्रात संध्याकाळी साडेपाच वाजता मतदानाचा आकडा आयोगाने दिला. त्यानंतर साडेपाच ते साडेसात या दोन तासांमध्ये ६५ लाख मतदारांनी मतदान केले. इतक्या कमी वेळेत एवढे मतदान होणे अशक्य आहे. एका मतदाराला मतदान करण्यासाठी अंदाजे ३ मिनिटे लागतात. तुम्ही गणित केले तर ६५ लाख मतदारांना मतदान करण्यासाठी पहाटे २ वाजेपर्यंत रांगा लावाव्या लागल्या असत्या. पण, तसे झालेले नाही. या मतदानाचे चित्रीकरण पाहू देण्याची मागणी काँग्रेसने आयोगाकडे केली होती. पण, आयोगाने नकार दिला एवढेच नव्हे तर नियमही बदलून टाकला.

नव्या नियमाचा आधार घेऊन हे चित्रीकरण दाखवण्यास आयोग नकार देत आहे, अशी टीका करत राहुल गांधी यांनी बोस्टनमधील भाषणात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर शंका उपस्थित केली. काँग्रेसने निवडणुकीतील घोटाळ्यांबाबत अधिक माहिती गोळा करण्यासाठी व या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी ह्यईगलह्ण नावाचा विशेष गट तयार केला आहे.