पीटीआय, नवी दिल्ली

गौतम अदानी आणि त्यांच्या पुतण्याविरुद्ध अमेरिकेने केलेल्या लाचखोरीचे आरोप नाकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांची एकत्रित यंत्रणा सारवासारव करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसने बुधवारी केला. तर, केंद्र सरकार अदानींचे संरक्षण करत असल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला.

संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी अदानी यांच्या अटकेची मागणी केली. अदानी समूहाने आरोप नाकारल्याबाबत विचारले असता राहुल म्हणाले की, ‘‘तुम्हाला काय वाटते अदानी आरोप स्वीकारतील? कोणत्या जगात राहत आहात? स्वाभाविकच ते आरोप नाकारतील.’’

अदानींविरोधातील आरोपांवर संसदेत तपशीलवार चर्चा केली जावी आणि सेबीसह अन्य तपास यंत्रणांनी या आरोपांची निष्पक्षपातीपणे चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसने केली. महेश जेठमलानी आणि मुकुल रोहतगी या वकिलांनी अदानींच्या समर्थनार्थ केलेल्या टिप्पण्या हा आरोपाचे गांभीर्य करण्याचा प्रयत्न असल्याची टीका पक्षाचे सरचिटणीस आणि माध्यम विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी केला. ‘‘हा क्षण भारताच्या संस्था आणि उच्चपदस्थ भारतीयांना त्यांच्या कृत्यांचे परिणाम भोगायला लावणारा आहे,’’ असे ते म्हणाले. ‘‘मोदी-अदानी यंत्रणेने आज सकाळी मोठा कायदेशीर तोफखाना सुरू केला. अदानी यांच्यावर अशा देशामध्ये आरोप झाले आहेत जेथील यंत्रणांना ते धाकदपटशा दाखवू शकत नाहीत किंवा त्या पोखरूही शकत नाहीत,’’ असे रमेश यांनी ‘एक्स’वर लिहिले आहे.

हेही वाचा >>>अदानींकडून लाचखोरीच्या आरोपांचे खंडन; अमेरिकेतील न्यायालयांत दाखल आरोपपत्रात नावे नसल्याचा समूहाचा दावा

वकिलांकडून अदानींसाठी युक्तिवाद

बुधवारी सकाळी माध्यमांशी बोलताना माजी महान्यायवादी मुकुल रोहतगी यांनी म्हटले होते की, ‘‘आरोपपत्रामध्ये एकूण पाच आरोप ठेवण्यात आले असून गौतम अदानी किंवा सागर अदानी यांच्यावर लाचखोरीचा आरोप कुठेही नाही.’’ तर ज्येष्ठ वकील आणि भाजपचे खासदार महेश जेठमलानी यांनीही माध्यमांशी बोलताना अदानी यांच्यावरील आरोप किरकोळ असल्याचे म्हटले होते. तसेच त्यांच्याविरोधातील पुरावेही अस्पष्ट असल्याचा दावा त्यांनी केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अदानींना अटक केली पाहिजे. आम्ही म्हटल्याप्रमाणे शेकडो लोकांना किरकोळ आरोपांवरून अटक केली जाते आणि या सद्गृहस्थांविरोधात हजारो कोटींच्या लाचखोरीच्या आरोपावरून अमेरिकेत आरोपपत्र दाखल केले जाते. त्यांना तुरुंगात टाकले पाहिजे. हे सरकार त्यांना संरक्षण देत आहे.- राहुल गांधी, विरोधी पक्षनेता, लोकसभा