उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने राज्यामध्ये जन विश्वास यात्रेचं आय़ोजन केलं आहे. याच यात्रेअंतर्गत अमेठीमध्ये योगी आदित्यनाथ यांनी राहुल गांधींवर निशाणा साधलाय. महात्मा गांधी हिंदू होते आणि गोडसे हिंदुत्ववादी होते या राहुल गांधींच्या वक्तव्यावरुन योगी यांनी निशाणा साधलाय. योगींनी, “आम्ही काहीही लपवलं नाहीय. आम्हाला कसलीच भिती वाटत नाही. जेव्हा मुख्यमंत्री नव्हतो तेव्हा पण म्हणायचो, आजही म्हणतो आणि पुढेही म्हणत राहील की, गर्व से कहो हम हिंदू है”, असं म्हणत राहुल यांच्यावर निशाणा साधला.
योगी यांनी संप्रदायकतेविरोधात कायदा आणून काही लोक हिंदूंना कैद करण्याचा विचार करत असल्याचा टोलाही योगींनी लगावला. तसेच “निवडणूक आल्यानंतर हे लोक हिंदू बनून बाहेर पडतात. यांचे पूर्वजच सांगायचे की आम्ही अॅक्सिडेंटल हिंदू आहोत. त्यामुळे हे लोक स्वत:ला हिंदू म्हणू शकत नाहीत,” असं योगींनी राहुल गांधीवर निशाणा साधताना म्हटलंय.
“मंदिरात कसं बसतात, हे देखील अमेठीच्या माजी खासदारांना (राहुल गांधी) माहिती नाही. त्यांनी ज्या मंदिराला भेट दिली, तिथल्या पुजाऱ्यांनी त्यांना कसं बसतात हे शिकवलं. हिंदुत्व किंवा हिंदुत्ववाद काय आहे, हे त्यांना ठाऊक नाही. तरीही ते चुकीचा प्रचार करत आहेत,” असा टोला योगींनी राहुल गांधींना लगावला.
यावेळी योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टीच्या नेत्यांवर देखील टीका केली. “काँग्रेस, सपा किंवा बसपाच्या एकाही नेत्याने किंवा लोकप्रतिनिधीने किंवा कार्यकर्त्याने करोना काळात लोकांना मदत केली नाही. यात त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षापासून सामान्य कार्यकर्त्यापर्यंत सगळ्यांचा समावेश आहे. जशा निवडणुका आल्या, ही लोकं इथे आली. निवडणुका झाल्यानंतर पुढची साडेचार वर्ष ते गायब होतील. इथे दिसणार देखील नाहीत”, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.