PM Narendra Modi Praises Young Congress Leaders And Slams Rahul Gandhi: भाजपाकडून आज एनडीएच्या नेत्यांसाठी चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी आणि गांधी कुटुंबियांवर नाव न घेता टीका केली आहे. याचबरोबर त्यांनी काँग्रेसमध्ये अनेक तरुण प्रतिभावान नेते असल्याचेही म्हटले आहे.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, विरोधी पक्षातील, विशेषतः काँग्रेसमधील अनेक तरुण नेते खूप प्रतिभावान आहेत परंतु “एका कुटुंबाच्या असुरक्षिततेमुळे” त्यांना बोलण्याची संधी मिळत नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, असे युवा नेते पक्षात असल्यामुळेच राहुल गांधी यांना असुरक्षित आणि चिंताग्रस्त वाटत असेल.

सूत्रांनी पुढे सांगितले की, सत्ताधारी आघाडीपुरत्या मर्यादित असलेल्या या कार्यक्रमाला कोणताही विरोधी पक्षाचा नेता उपस्थित नव्हता. याचबरोबर अनेक महत्त्वाची विधेयके मंजूर झाल्यामुळे नुकतेच संपलेले संसदेचे अधिवेशन चांगले झाल्याचेही पंतप्रधानांनी म्हटले. याबाबत इंडिया टुडेने वृत्त दिले आहे.

यावेळी पंतप्रधानांनी ऑनलाइन गेम्स विधेयक मंजूर झाल्याचे विशेषतः कौतुक केले आणि ते दूरगामी परिणाम करणारे आणि व्यापक कायदे असलेले विधेयक असल्याचे म्हटले. त्यांनी ऑनलाइन गेमिंग विधेयकाचा उल्लेख करून ते “दूरगामी परिणाम” असलेली सुधारणा असल्याचे म्हटले ज्याचा थेट जनतेवर परिणाम होईल.

सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधानांनी प्रमुख कायद्यांवरील चर्चेत सहभागी न झाल्याबद्दल विरोधी पक्षांवर टीका केली. “ते फक्त व्यत्यय आणण्यातच गुंतले होते”, असे ते म्हणाले.

संसदेने २० ऑगस्ट रोजी ऑनलाइन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक, २०२५ मंजूर केले, ज्यामध्ये ऑनलाइन मनी गेमिंग कंपन्या, त्यांचे प्रवर्तक आणि उल्लंघनात सहभागी असलेल्या व्यक्तींविरोधात कठोर नियम आणि दंडाच्या तरतुदी आहेत.

या विधेयकात पैशावर आधारित ऑनलाइन गेम्सवर बंदी आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षेच्या तरदुदी, तसेच वेगाने वाढणाऱ्या परंतु वादग्रस्त ऑनलाइन गेमिंग क्षेत्राचे नियमन करण्याचा प्रयत्न केला आहे.

ऑल इंडिया गेमिंग फेडरेशनने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून प्रस्तावित ऑनलाइन गेमिंग विधेयकावर तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे आणि असा इशारा दिला आहे की संपूर्ण बंदीमुळे या क्षेत्राचे मोठे नुकसान होऊ शकते.