काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे भारताच्या राजकारणातील ‘वाया गेलेले बालक’ असून त्यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्ष अत्यंत बेजबाबदार वर्तन करीत आहे, अशी जोरदार टीका भाजपचे प्रवक्ते एम. जे. अकबर यांनी शुक्रवारी केली.
अकबर पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, आज काँग्रेसचे वर्तन पूर्णपणे बेजबाबदारपणाचेच दिसत आहे. कर्नाटकात सत्तारूढ असो वा दिल्लीत विरोधी पक्षात. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष पूर्णपणे बेजबाबदारपणे वागत आहे.
‘राहुल गांधी हे भारतीय राजकारणातील एक वाया गेलेले बालक आहे. त्यांच्याकडे सत्यता नाही की अनुभव नाही,’ असे अकबर यांनी नमूद केले. राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांबद्दल काँग्रेस देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे, असाही आरोप अकबर यांनी केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानांचा विपर्यास करण्यात आला आणि प्रामुख्याने बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार व माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी हा विपर्यास केला, असा आरोप अकबर यांनी केला. बिहारच्या निवडणुकाच डोळ्यासमोर ठेवून या दोघांनी सरसंघचालकांच्या विधानांचा सोयीस्कर अर्थ लावला, असे अकबर या वेळी म्हणाले.