Rahul Gandhi : जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं होतं. भारत-पाकिस्तान संघर्षाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधीही अनेकदा विधाने केलेले आहेत. मात्र, आज डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान संघर्षासंदर्भात एक मोठा दावा केला. ‘भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान ५ लढाऊ विमाने पाडण्यात आले’, असं ट्रम्प यांनी म्हटलं. त्यांच्या या दाव्यानंतर चर्चांना उधाण आलं.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दाव्यानंतर आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल विचारला आहे. ५ लढाऊ विमानांबद्दल नेमकं सत्य काय आहे? असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे. या संदर्भात राहुल गांधी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याच्या व्हिडीओ एक्सवर (ट्विटर) शेअर केला आणि विचारलं की, “मोदीजी, ५ विमानांबद्दल सत्य काय आहे? देशाला जाणून घेण्याचा अधिकार आहे”, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी नेमकं काय म्हटलं?
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं. भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान पाच विमाने पाडण्यात आली. मे महिन्यात झालेल्या शस्त्रविरामानंतर परिस्थिती शांत झाली असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. व्हाईट हाऊसमधील काही रिपब्लिकन खासदारांसोबतच्या भोजनादरम्यान ट्रम्प यांनी हे विधान केलं.
मोदी जी, 5 जहाज़ों का सच क्या है?
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 19, 2025
देश को जानने का हक है! pic.twitter.com/mQeaGCz4wp
दरम्यान, हे पाडली गेलेली विमानं भारताची होती की पाकिस्तानची हे मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले नाही. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा असा दावा केला की त्यांनी व्यापाराच्या नावाखाली दोन्ही अण्वस्त्रधारी देशांमधील शस्त्रविराम घडवून आणला होता. दोन देशांमधील युद्धासारख्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी त्यांच्या प्रशासनाच्या भूमिकेवर प्रकाश टाकताना डोनाल्ड ट्रम्प यांनी हे विधान केले. “खरं तर विमानांवर हवेतून गोळीबार केला जात होता. मला वाटतं प्रत्यक्षात पाच विमानं पाडण्यात आली”, असे ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान युद्धाबाबत बोलताना सांगितले. मात्र याबाबत त्यांनी सविस्तर कोणतीही माहिती दिलेली नाही.
भारत-पाकिस्तान शस्त्रविरामाचं श्रेय घेण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न
वॉशिंग्टनने दोन्ही देशांशी चर्चा केल्यानंतर १० मे रोजी सोशल मीडियावर जाहीर केलेल्या भारत-पाकिस्तानमधील शस्त्रविरामाचे श्रेय डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार स्वत:कडे घेतले. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान शस्त्रविराम करारासाठी व्यापार कराराला जबाबदार धरले, हा दावा भारताने मात्र फेटाळून लावला. नवी दिल्ली आणि इस्लामाबादने त्यांच्यातील समस्या थेट आणि कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय सोडवल्या पाहिजेत अशी भारताची भूमिका आहे.