पाटणा : महाराष्ट्र व हरियाणा या दोन राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतचोरी करून भाजपने निवडणुका जिंकल्या आहेत. या दोन राज्यांमध्ये मतचोरी कशी केली गेली हे काँग्रेसकडून लवकरच उघड केले जाईल, असा दावा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी आरा येथील जाहीर सभेत केला.
बिहारमधील या यात्रेच्या आधी दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत कर्नाटकमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये मतांची चोरी केली गेल्याचा दावा राहुल गांधींनी केला होता. राहुल गांधींनी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचा दावा केला होता. मात्र त्यासंदर्भात पुरावे सादर केलेले नव्हते. राहुल गांधी यांच्या यात्रेची सांगता गांधी मैदानात जाहीर सभेने केली जाणार होती, पण राज्य सरकारने परवानगी दिली नाही. आता पाटणा शहरात सोमवारी राहुल गांधींची पदयात्रा काढली जाईल. पाटणातील गांधी मैदानातून निघून ही पदयात्रा आंबेडकर पार्कमध्ये संपेल.
नारा मनात भिनला
बिहारमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने राबवलेल्या मतदार फेरतपासणी मोहिमेला महागठबंधनने व्होटर अधिकार यात्रेतून तीव्र विरोध केला. या यात्रेमुळे व्होट चोर, गर्दी छोड, ही घोषणा बिहारच्याच नव्हे तर देशभरातील जनतेच्या मनावर बिंबवली गेली आहे. मतांची चोरी करून भाजप राज्या-राज्यांत निवडणुका कशा जिंकत आहे, हे आता लोकांना कळले आहे. महाराष्ट्र व हरियाणाप्रमाणे बिहारमध्ये मतांची चोरी होऊ दिली जाणार नाही, अशी ग्वाही राहुल गांधी यांनी सभेत दिली.
२५ जिल्ह्यांत ११० मतदारसंघांत दौरा…
दोन आठवड्यांच्या कालावधीमध्ये राहुल गांधी यांनी पूर्व- पश्चिम व दक्षिण- उत्तर असा बिहार पिंजून काढला. २५ जिल्ह्यांतील ११०हून अधिक विधानसभा मतदारसंघांमधून ही यात्रा काढली गेली. सुमारे १३०० किमीचा पल्ला पार करणारी ही यात्रा महागठबंधनच्या एकजुटीचे संकेत देणारी होती. या यात्रेमध्ये राहुल गांधी यांच्याबरोबर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव सर्व दिवस सहभागी झाले होते. एका टप्प्यात राहुल गांधीविनाही तेजस्वी यादव यांच्या उपस्थितीत ही यात्रा काढली गेली. तमिळनाडूचे मुख्यमंत्री व द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन, तसेच आरामध्ये समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव हे इंडिया आघाडीतील नेतेही सहभागी झाले होते.