Rahul Gandhi on Narendra Modi and Donald Trump : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी (२९ जुलै) संसदेत ‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेदरम्यान केलेल्या भाषणात भारत व पाकिस्तानमधील युद्धविरामाच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांवरून मोदी सरकारला धारेवर धरलं होतं. राहुल गांधी म्हणाले, “सरकारने ट्रम्प यांचे दावे फेटाळले आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला सांगावं की ट्रम्प खोटं बोलत आहेत.” परंतु, मोदी कोणाचाही उल्लेख न करता म्हणाले की कोणत्याही जागतिक नेत्याने भारताला ऑपरेशन सिंदूर थांबवण्यास सांगितलं नव्हतं. दरम्यान, राहुल यांची मागणी बालिशपणाची असल्याची टिप्पणी भाजपाने केली आहे.
भाजपाने म्हटलं आहे की मोदी यांनी स्पष्ट केलं आहे की जगातील कुठल्याही नेत्याने भारताला युद्ध थांबवण्यास सांगितलं नव्हतं. तरी राहुल गांधी अजून तिथेच का अडकलेत? हा बालिशपणा आहे. भाजपाने केलेल्या टीकेवर राहुल गांधी यांनी आज पुन्हा हल्लाबोल केला. त्यांनी काही वेळापूर्वी संसदेच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी राहुल गांधी म्हणाले, “ट्रम्प खोटं बोलत आहेत असं मोदी म्हणाले तर ट्रम्प सगळी सत्यता जगासमोर मांडतील याची मोदींना भिती आहे.”
राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधी म्हणाले, “पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांचा साधा उल्लेखही केला नाही. ट्रम्प खोटे दावे करत आहेत असं मोदी म्हणाले नाहीत. कारण सर्वांना माहिती आहे की बाहेर नेमकं काय चालू आहे. मोदी ट्रम्प यांच्याबद्दल काहीच बोलू शकत नाहीत. त्यांना बोलताच येत नाहीये आणि हेच वास्तव आहे. मोदी ट्रम्प यांचा उल्लेख करत नाहीत किंवा ते खोटं सागंत असल्याचं स्पष्ट करत नाहीत कारण त्यांना भिती वाटते की आपण जर ट्रम्प यांच्याबद्दल बोललो तर ट्रम्प सगळी सत्यता जगासमोर मांडतील. ट्र्म्प यांना व्यापार करार करायचा आहे. ते तिथून बटण दाबतील आणि इथे लगेच व्यापार करार पूर्ण होईल.”
प्रियांका गांधींचाही मोदी सरकारवर हल्लाबोल
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी देखील काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. त्या म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदी व परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर गोलगोल वक्तव्ये करत आहेत. काहीही उत्तरं देत आहेत. त्यांनी इकडचे तिकडचे दावे करण्याऐवजी स्पष्ट शब्दांत सांगावं की ट्रम्प खोटं बोलत आहेत. ट्रम्प यांचे दावे खोटे आहेत. परंतु, ते स्पष्ट बोलणं टाळत आहेत.”