गेल्या काही दिवसांमध्ये गुजरातमधील विकासाच्या मुद्द्यावरून भाजपला लक्ष्य करणाऱ्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले आहे. गेल्या २२ वर्षांपासून गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे. मात्र, यावेळी पंतप्रधानांच्या प्रचाराच्या भाषणातून ‘विकास’ हा शब्दच हरवल्याचे दिसते. ते केवळ भाषणंच करत आहेत. विकासावर बोलत नाहीत. त्यामुळे आता त्यांचं ‘भाषण’ हेच ‘शासन’ आहे काय?, असा खोचक सवाल राहुल यांनी ट्विटरवरून विचारला.

गुजरातचे रिपोर्ट कार्ड पाहिल्यानंतर मी दहा प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, अजूनपर्यंत मला त्यांची उत्तरे मिळालेली नाहीत. पहिल्या टप्प्याचा प्रचार संपत आला होता तेव्हा भाजपकडून निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला नव्हता. ही सगळी परिस्थिती पाहता आता मोदींचे भाषण हेच शासन मानायचे का, असा प्रश्न पडल्याचे राहुल यांनी म्हटले. यापूर्वी रोजगार, शिक्षण, महिला सुरक्षा आणि रोजगार आदी मुद्द्यांवरून राहुल यांनी पंतप्रधानांना १० प्रश्न विचारले होते.

तत्पूर्वी आज सकाळी गुजरात विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली. यावेळी राहुल गांधी यांनी मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहनही केले होते. तर या निवडणुकीत काँग्रेसला ११० पेक्षा जादा जागा मिळतील, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी केला होता.