Rahul Gandhi targets foreign minister S Jaishankar : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव काही प्रमाणात कमी झाला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान पूर्णपणे बॅकफूटवर असून भारताकडून जागतिक समूहासमोर दहशतवादाला पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानचा चेहरा उघडा पाडण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यादरम्यान सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आता राजकारण देखील तापल्याचे पाहायला मिळत आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची एक सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर राहुल गांधी यांनी एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना लक्ष्य केले आहे.
राहुल गांधी त्यांच्या पोस्टमध्ये सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणाले की, “आपल्या हल्ल्याच्या सुरुवातीला पाकिस्तानला माहिती देणे हा गुन्हा होता. परराष्ट्र मंत्र्यांनी हे जाहीरपणे कबूल केले आहे की भारत सरकारने हे केले. याची कोणी परवानगी दिली? परिणामी आपल्या हवाई दलाने किती विमाने गमावली?” या बरोबर राहुल गांधी यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा माध्यमांशी संवाद साधतानाचा व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे.

व्हिडीओमध्ये काय आहे?
राहुल गांधी यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये एस. जयशंकर हे भारताच्या पाकिस्तानविरोधातील कारवाईबद्दल बोलताना दिसत आहेत. “ऑपरेशनच्या सुरूवातीला आम्ही पाकिस्तानला संदेश पाठवला होता की आम्ही दहशतवादी तळांना लक्ष्य करत आहोत. आम्ही लष्कराला लक्ष्य करणार नाहीत. त्यामुळे लष्कराकडे या प्रक्रियेत हस्तक्षेप न करण्याचा आणि वेगळे राहण्याचा पर्याय होता, पण त्यांनी हा चांगला सल्ला न स्वीकारण्याचा निर्णय घेतला,” असे एस. जयशंकर माध्यमांशी म्हणत आहेत.
दरम्यान ७ मे रोजी पहाटे १ ते १.३० दरम्यान भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी स्थळांवर हल्ला केला होता. यानंतर लष्करी कारवायांचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी त्यांचे पाकिस्तानी समकक्ष मेजर जनरल काशिफ अब्दुल्ला यांना फोन केला होता, या फोन कॉलच्या संदर्भात एस. जयशंकर माध्यमांना माहिती देत होते.
लेफ्टनंट घई यांनी त्यांच्या समकक्ष पाकिस्तानी अधिकाऱ्यांना सांगितले होते की, भारताने काळजीपूर्वक निवडलेल्या दहशतवादी तळांवर हल्ला केला आणि कोणत्याही लष्करी तळाला लक्ष्य केले नाही. या माध्यमातून पाकिस्तानला संदेश देण्यात आला की जर त्यांना चर्चा करायची असेल तर भारत संवादासाठी तयार आहे.
दरम्यान परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात माहिती दिली आहे की, परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटले होते की आम्ही सुरुवातीलाच पाकिस्तानला इशारा दिला होता, जो की स्पष्टपणे ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतरचा सुरुवातीचा टप्पा आहे. हे (ऑपरेशन सिंदूर) सुरू होण्यापूर्वीचे असल्याचे दाखवले जात आहे. वास्तविकता पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने दाखवली जात असल्याचे दिसून येत आहे.
भारताने किती विमाने गमावली?
डीजीओमओ लेफ्टनंट जनरल घई आणि नौदलाचे समकक्ष व्हाइस अॅडमिरल एएन प्रमोद यांच्यासह ११ मे रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत एअर ऑपरेशनचे डीजी एअर मार्शल ए. के. भारती म्हणाले होते की, सध्याच्या संघर्षाच्या स्थितीमुळे ऑफरेशन सिंदूरमध्ये भारताने विमाने गमावली की नाही याबद्दल ते भाष्य करू इच्छित नाहीत.