Rahul Gandhi : मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर गेलेल्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना त्यांच्या पक्षांच्या शिस्तीच्या कठोर नियमांचा सामना करावा लागला. उशीरा पोहचल्याने राहुल गांधींना शिक्षा म्हणून राहुल गांधी यांनी १० पुशअप्स करावे लागले. मध्य प्रदेशातील पचमढीमध्ये आयोजित काँग्रेस जिल्हा अध्यक्षांच्या प्रशिक्षण सत्रादरम्यान उशीर करणाऱ्यांना अनोखी शिक्षा देण्याचा पायंडा पाडला होता. उशिरा येणाऱ्याचे स्वागत टाळ्या वाजून त्यांना ‘टाईम मॅनेजमेंट’ महत्व कळावे आणि प्रतीकात्मक शिक्षाही दिली जात होती. याच ठिकाणी राहुल गांधी स्वत:च २० मिनिटं उशिरा पोहचले. त्यामुळे त्यांना दहा पुशअप्सची शिक्षा झाली जी त्यांनी हसत स्वीकारली.
राहुल गांधींना दहा पुशअप्सची शिक्षा
राहुल गांधी यांना प्रशिक्षण शिबीरात पोहचण्यास उशीर झाला. त्यामुळे त्यांनी दहा पुशअप्सची शिक्षा हसत हसत स्वीकारली. तसंच या उपक्रमाचं कौतुक केलं. काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिराचे प्रमुख सचिन राव यांनी राहुल गांधींना जेव्हा सांगितलं की उशिरा येणाऱ्या शिक्षा केली जाते तेव्हा राहुल गांधींनी विचारलं की काय शिक्षा आहे? त्यावर १० पुशअप्स हे उत्तर त्यांना देण्यात आलं. ज्यानंतर राहुल गांधींनी कुठलीही तक्रार न करता ही शिक्षा घेतली.
राहुल गांधी यांची भाजपावर आणि निवडणूक आयोगावर टीका
पचमढी या ठिकाणी राहुल गांधी यांनी भाजपा आणि निवडणूक आयोगावर कायम मतचोरीचा पुन्हा एकदा आरोप केला. निवडणूक आयोगावर मोठ्या प्रमाणात अनियमितता केल्याचा आरोप केला आणि मध्य प्रदेशातही अशाच प्रकारचा गोंधळ आयोगाने केला असल्याचा आरोप केला. राहुल गांधी म्हणाले की काही दिवसांपूर्वी मी हरियाणा मॉडेल सादर केले होते. २५ लाख मतांची चोरी झाल्याचं दाखवून दिलं. प्रत्येक आठ मतदारांपैकी एकाचं मत चोरलं होते. ही यांची व्यवस्था आहे. मुख्य मुद्दा ‘व्होट चोरी’ आहे. आमच्याजवळ पुरावे आहेत आणि आम्ही एक- एक करुन जाहीर करणार आहोत. या आरोपांना भाजपा आणि निवडणूक आयोगाने हे आरोप फेटाळले आहेत.
भाजपाची राहुल गांधींवर टीका
भाजपाने राहुल गांधी यांच्यावर टीका करताना म्हटले की बिहार निवडणूक प्रचारात राहुल गांधी सुट्टीवर होते. भाजपाचे प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी एक्स पोस्ट करत म्हटले की, ‘राहुल गांधी यांच्यासाठी विरोधी पक्ष नेता अर्थात LoP म्हणजे ‘लीडर ऑफ पर्यटन (Paryatan)’ आणि पार्टी करणे आहे. त्यांनी टीका करताना म्हटले की जेव्हा बिहारात निवडणूक सुरु आहे, राहुल गांधी पचमढीत जंगल सफारीचा आनंद घेत आहेत. पुनावाला यांनी गालिब यांच्या ओळी बदलून म्हटले यावरुन त्यांची प्राथमिकता कळते आणि निवडणूक हरल्यानंतर ते ईसीआयला दोष देतील.
