काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी लवकरच काँग्रेसची सूत्रे हातात घेण्याची शक्यता आहे. ३० ऑक्टोबरपर्यंत राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होतील असे सूत्रांनी सांगितले आहे. राहुल गांधी हे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्यास उत्सुक असून प्रक्रियेनुसारच ते अध्यक्ष होतील असे एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याने इंडियन एक्सप्रेसला सांगितले.
ऑक्टोबर महिन्यामध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीमध्ये राहुल गांधी हे प्रबळ दावेदार असतील. सध्या सोनिया गांधी या काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. गेल्या १९ वर्षांपासून त्या या पदावर आहेत. त्या आता विश्रांती घेतील आणि राहुल गांधी हे अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील असे त्यांनी म्हटले.
राहुल गांधी यांनी अध्यक्षपद हाती घ्यावी अशी काँग्रेस समितीच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. परंतु काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे ज्यामध्ये अंतर्गत लोकशाही आहे. त्यानुसार ही प्रक्रिया पूर्ण होईल असे ते म्हणाले. या निवडणुकीचे वेळापत्रक ठरवण्यावर वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होत आहे. ही निवडणूक पक्षाचे नेते मुल्लापल्ली रामचंद्रन घेणार आहेत. त्यासाठी त्यासंदर्भात त्यांनी राहुल गांधी, अहमद पटेल, ए. के. अॅंटनी, जनार्दन द्विवेदी, यांची भेट घेतली आहे. त्यांच्यासोबत चर्चा करुन ते पुढील रुपरेषा ठरवणार आहेत.
निवडणुकीची पद्धत ही पारदर्शक असेल असे रामचंद्रन यांनी सांगितले. काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे ज्यामध्ये लोकशाहीच्या मार्गाने निवडणूक होऊन अध्यक्षाची निवड होते असे रामचंद्रन म्हणाले. काँग्रेस अध्यक्षाची निवड २०१५ पर्यंत होणे अपेक्षित होते परंतु काही कारणांमुळे या प्रक्रियेला वेळ लागला. निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करुन अध्यक्षाची पुन्हा निवड करण्यात यावी असे सांगितले आहे. पक्षाने दरवेळी मुदतवाढ करुन घेतली परंतु आता यावेळी मात्र जून २०१७ पर्यंत सदस्य नोंदणी पूर्ण करुन ही प्रक्रिया आम्ही लवकर संपवू असे काँग्रेसने निवडणूक आयोगाला कळवले आहे.