Rahul Gandhi vs UP Minister Dinesh Pratap Singh : लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री दिनेश प्रताप सिंह यांच्यात एका बैठकीत जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. रायबरेली मतदार संघातील निधीवरून दोघांमध्ये वाद झाला. या मतदारसंघाला खूप उशिराने निधी मिळतोय, असं म्हणत राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच ते म्हणाले की “मी दिशा बैठकीचा अध्यक्ष आहे. त्यामुळे मला विचारून चर्चा व्हायला हवी.” यावर दिनेश सिंह म्हणाले, “तुम्ही लोकसभेत अध्यक्षांचं ऐकत नाही. मग इथे आम्ही तुमचं का ऐकावं?”
राहुल गांधी हे सध्या त्यांच्या मतदारसंघात म्हणजेच रायबरेलीमध्ये फिरत आहेत. आज (१२ सप्टेंबर) रायबरेलीत ‘दिशा’ बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीवेळी त्यांचा मंत्री दिनेश सिंह यांच्या शाब्दिक वाद झाले. या बैठवेळी दिनेश प्रताप सिंह यांनी असे काही मुद्दे मांडले ज्याबद्दल बैठकीतील इतर सदस्यांना कल्पना देण्यात आली नव्हती. त्यावरून राहुल गांधी म्हणाले, “मी दिशा बैठकीचा अध्यक्ष आहे, त्यामुळे मला विचारून चर्चा व्हायला हवी.” यावर दिनेश सिंह म्हणाले, “लोकसभेत तुम्ही लोकसभा अध्यक्षांचं ऐकत नाही. मग इथे मी तुमचं ऐकायला बांधील नाही.” सिंह यांच्या या वक्तव्यामुळे बैठकीतील वातावरण अजून तापलं.
राहुल गांधी व दिनेश प्रताप सिंह यांच्यातील वादाचा व्हिडीओ व्हायरल
दोन्ही नेत्यांमधील वादाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. यामध्ये राहुल गांधी व दिनेश सिंह यांच्यात तू-तू, मैं-मैं चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. दिनेश प्रताप सिंह हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसमध्ये असताना ते गांधी कुटुंबाच्या जवळचे असल्याचं सांगितलं जात होतं. परंतु, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी काँग्रेसला रामराम करत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
दिनेश सिंह यांनी २०१९ मध्ये भाजपाच्या तिकीटावर रायबरेलीमधून सोनिया गांधी यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना १.६७ लाख मतांनी पराभव पत्करावा लागला. २०२४ मध्ये देखील भाजपाने त्यांना रायबरेलीतून लोकसभेचं तिकीट दिलं होतं. यावेळी राहुल गांधी यांनी त्यांचा ३.९० लाख मतांनी पराभव केला. त्यानंतर भाजपाने त्यांना विधान परिषदेवर पाठवलं. तसेच, त्यांच्याकडे फलोत्पादन, कृषी निर्यात, परदेशी व्यापार राज्यामंत्रिपद (स्वतंत्र कार्यभार) सोपवण्यात आलं आहे.