राहुल गांधी यांच्या डोळ्यांवर इटालियन चष्मा असल्यामुळे त्यांना देशात घडत असलेले बदल दिसत नसल्याची टीका भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केली. ते रविवारी अहमदाबाद येथील कार्यक्रमात बोलत होते. काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकाळात काय बदल घडला, असा सवाल राहुल गांधी करतात. सरकार बदलले तरी सीमेवर पाकिस्तानकडून होणारे हल्ले थांबलेले नाहीत, असेही ते म्हणतात. मात्र, राहुल गांधीजी तुमच्या डोळ्यावर जो इटालियन चष्मा आहे, त्यामुळेच तुम्हाला बदललेली परिस्थिती दिसत नसल्याचे शहा यांनी म्हटले. या इटालियन चष्म्यातून तुम्हाला देशात घडत असलेला बदल दिसणार नाही, असे देखील शहा यांनी सांगितले. यापूर्वी सीमेवर पाकिस्तानकडून हल्ला झाल्यास लष्कराला आदेशांची वाट पाहावी लागत असे. मात्र, आता भारतीय लष्कर कोणत्याही आदेशांशिवाय चोख प्रत्युत्तर देऊ शकते. याशिवाय, मोदींच्या कार्यकाळात देशातील शेतकरी आणि दुर्बल वर्गासाठी अनेक योजना सुरू करण्यात आल्या. मोदींनी ज्याप्रमाणे गुजरातमध्ये कल्याणकारी राज्य निर्माण केले त्याचप्रमाणे ते आता देशाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखालील सरकार जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करेल, असा विश्वास यावेळी अमित शहा यांनी व्यक्त केला.