BJP Leader Threat to Rahul Gandhi: केरळमधील भाजपाचे प्रवक्त्यांनी लाईव्ह टीव्हीवरील चर्चेदरम्यान काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर काँग्रेसचे खासदार केसी वेणुगोपाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली, तसेच सदर प्रवक्त्यावर कारवाई करण्याची मागणी केली. ‘राहुल गांधींच्या छातीत गोळी घालू’, असे विधान केरळ भाजपा नेते, प्रवक्ते पिंटू महादेवन यांनी टीव्हीवरील चर्चेत म्हटले.
केसी वेणुगोपाल यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले, राजकीय क्षेत्रातील मतभेद राजकीयदृष्ट्या आणि संवैधानिक चौकटीत सोडवायला हवेत. मात्र भाजपाचे नेते त्यांच्या विरोधकांना लाईव्ह टीव्हीवर जीवे मारण्याची धमकी देत आहेत. निश्चितच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाच्या विचारसरणीविरुद्ध राहुल गांधींच्या लढाईने त्यांना अस्वस्थ केलेले आहे.
केसी वेणुगोपाल यांनी या पत्रात राहुल गांधींना सोशल मीडियावर वारंवार देण्यात येणाऱ्या धमक्यांकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. यापैकी काही भाजपाशी संबंधित लोक आहेत. त्यांनी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्यांचा उल्लेख केलेला असल्याचे वेणुगोपाल यांनी म्हटले.
थंडपणे आणि नियोजनबद्धपणे ही धमकी दिली असल्याच आरोप करत काँग्रेसने भाजपा प्रवक्त्यावर कारवाईची मागणी केली. वेणुगोपाल यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले की, महादेवन यांनी केलेले विधान हे जीभ घसरण्याचा किंवा अतिरंजित विधानाचा प्रकार नाही. ही थंडपणे आणि नियोजन पद्धतीने दिलेली धमकी आहे. भारतातील एक आघाडीचे राजकीय नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते यांना थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
महादेवन यांच्या धमकीचा काँग्रेस पक्षाने समाचार घेतला आहे. एका नतद्रष्ट पदाधिकाऱ्याने निष्काळजीपणे आणि जाणुनबुजून जोपासलेल्या द्वेषाच्या विषारी वातारणाचे हे लक्षण असल्याचे काँग्रेसने म्हटले.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी तातडीने या पदाधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसने केली. अन्यथा राहुल गांधीविरोधात हिंसाचाराला वैधता दिल्याचा परवाना दिलेला आहे, अशी समजूत पसरेल.