देशभरातील काँग्रेसविरोधी वातावरण आणि भाजपचे नरेंद्र मोदी यांना मिळणारी पसंती या पाश्र्वभूमीवर लोकसभा निवडणुकीच्या आधी राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित न करण्याचा निर्णय काँग्रेसच्या कार्यसमितीने गुरुवारी घेतला. ‘राहुल यांच्या नावाची घोषणा व्हावी’ असा समितीतील अनेक नेत्यांचा आग्रह असताना पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्याला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे राहुल गांधी हे काँग्रेसच्या प्रचारसमितीचे प्रमुख म्हणूनच निवडणुकांना सामोरे जातील.
काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन शुक्रवारपासून दिल्लीत होत आहे. या पाश्र्वभूमीवर काँग्रेसच्या कार्यसमितीची बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीत सहभागी झालेल्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी ‘काँग्रेसने राहुल यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करावे’ अशी भूमिका मांडली. मात्र, पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी याला साफ नकार दिला. ‘निवडणुकीपूर्वी पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करण्याची काँग्रेसची परंपरा नाही,’ असे सोनिया यांनी बैठकीत सांगितल्याचे समजते. त्यानंतर राहुल यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसमितीचे प्रमुख बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतची अधिकृत घोषणा शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात होणार आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी याला दुजोरा दिला.  मात्र, निवडणुकीनंतर कोणतीही जबाबदारी राहुल गांधी यांच्यावर सोपवली जावू शकते, असे सूचक वक्तव्य द्विवेदी यांनी केले.