Rain Updates: शनिवारी ओडिशामध्ये सुमारे दोन तासांत तब्बल ६१,००० वेळा वीज कोसळून १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर या निसर्गाच्या कोपाने १४ जण जखमी झाल्याचे विशेष मदत आयुक्त (SRC) सत्यब्रत साहू यांनी सांगितले. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) ७ सप्टेंबरपर्यंत राज्यात हवामानाची स्थिती आणखी बिघडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
बंगालच्या उपसागरात सक्रिय असलेले चक्रीवादळ पुढील ४८ तासांत कमी दाबाच्या क्षेत्रात तीव्र होऊ शकते आणि त्याच्या प्रभावामुळे ओडिशामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. रविवारी दुपारी सुमारे पाच तास मुसळधार पाऊस आणि ढगांच्या गडगडाटाने भुवनेश्वरमध्ये निसर्गाचे रौद्ररूप दिसून आले होते. IMD च्या बुलेटिननुसार आठवड्याच्या शेवटी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आयएमडीने पुढे म्हटले आहे की, “बहुतांश जिल्ह्यांमध्ये 7 सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीचा (येलो) अलर्ट देण्यात आला आहे.
शनिवारी झालेल्या विजेच्या कोसळण्याच्या दुर्घटनेतील मृतांपैकी चार खुर्द जिल्ह्यातील, दोन बालनगीर आणि अंगुल, बौध, ढेंकनाल, गजपती, जगतसिंगपूर आणि पुरी येथील प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश असल्याचे एसआरसीने सांगितले. याशिवाय, गजपती आणि कंधमाल जिल्ह्यांमध्ये वीज कोसळल्याने आठ गुरेही ठार झाली आहेत. दरम्यान, आता मृतांच्या कुटुंबाला ४ लाख रुपये अनुदान दिले जाईल अशी माहिती सत्यब्रत साहू यांनी दिली आहे.
हे ही वाचा<< पुण्यातील रस्त्यावरच्या खड्ड्यांना हार घालून श्रद्धांजली वाहतेय ‘ही’ व्यक्ती? पाहा व्हायरल व्हिडीओ
या घटनेनंतर हवामान शास्त्रज्ञांनी सांगितले की, जेव्हा मान्सून दीर्घ विश्रांतीनंतर सामान्य स्थितीत परत येतो तेव्हा या असामान्य आणि अत्यंत गंभीर स्वरूपातील विजांच्या हालचाली होतात. येत्या आठवडाभरात पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.