भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा कायमस्वरुपी सदस्य नाही. कायमस्वरुपी सदस्यत्वासाठी भारताने अनेकदा आपली दावेदारी सिद्ध केली आहे. यासाठी जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीने भारताला पाठिंबा दर्शवला आहे. टेस्ला, स्पेसएक्स आणि एक्सचे मालक एलॉन मस्क यांनी जगातल्या शक्तीशाली देशांना आरसा दाखवत भारताची पाठराखण केली आहे. मस्क म्हणाले, जगातला सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असूनही भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं स्थायी सदस्यत्व न देणं हा वेडेपणा आहे.

एलॉन मस्क यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये म्हटलं आहे की, सयुंक्त राष्ट्रांच्या संस्थांमध्ये सुधारणांची आवश्यकता आहे. परंतु, ज्यांच्याकडे ताकद आहे त्यांना त्या जुन्या गोष्टी सोडायच्या नाहीत. पृथ्वीवरील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असूनही भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं स्थायी सदस्यत्व दिलेलं नाही. हा सगळा वेडेपणा आहे. परिषदेत आफ्रिका खंडातील देशांसाठी एक जागा असायला हवी.

मायकल आयजेनबर्ग यांच्या पोस्टवर रिप्लाय देत मस्क यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेविषयी आपलं मत मांडलं आहे. आयजेनबर्ग यांनी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्या एका वक्तव्यावर एक प्रतिक्रिया दिली होती. त्यावरच मस्क यांनीदेखील आपलं मत मांडलं. अँटोनियो गुटेरेस यांनी आफ्रिकेसाठीच्या एका स्थायी सदस्यत्वावर भाष्य केलं होतं. यावर आयजेनबर्ग म्हणाले, मग भारताबद्दल तुम्ही काय बोलणार आहात? मला असं वाटतं की, सध्याची यूएन सुरक्षा परिषद बरखास्त करावी आणि नव्या नेतृत्वांसह नवीन समिती तयार करावी.

भारत हा गेल्या १६ वर्षांमध्ये आठ वेळा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य होता. तसेच भारत जी-४ समुहाचाही सदस्य आहे. जी-४ अशा देशांचा समूह आहे जो संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं स्थायी सदस्यत्व मिळावं यासाठी एकमेकांचं समर्थन करतो.

हे ही वाचा >> “मोदी फक्त श्रेय लाटण्यासाठी…”, ज्ञानवापी, मथुरेतल्या मंदिरावरून भाजपा नेत्याचा पंतप्रधानांना घरचा आहेर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत म्हटलं होतं की, जेव्हा संयुक्त राष्ट्रांची स्थापना करण्यात आली होती तेव्हा जगाची परिस्थिती वेगळी होती. आज सर्व देश ज्या स्थानावर आहेत तशी परिस्थिती तेव्हा नव्हती. तसेच त्यावेळी संयुक्त राष्ट्रांमध्ये ५१ संस्थापक सदस्य होते. आज संयुक्त राष्ट्रांमधील सदस्य देशांची संख्या जवळपास २०० इतकी आहे. परंतु, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्य देशांची संख्या तेवढीच आहे. यात नवे देश समाविष्ट केले नाहीत.