Raj Mishra Mayor In Englad: उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील राज मिश्रा यांची इंग्लंडच्या नॉर्थम्प्टनशायरमधील वेलिंगबरोच्या नगराध्यक्षपदी निवड झाली आहे. ३७ वर्षीय राज मिश्रा हे ६ मे रोजी झालेल्या स्थानिक निवडणुकीत शहरातील व्हिक्टोरिया प्रभागातून निवडून आले होते. त्यानंतर नगरपालिकेच्या बैठकीत वेलिंगबरोचे पाचवे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यांच्या निवडीच्या बातमीने मिर्झापूरमधील त्यांचे कुटुंबीय आणि मित्र परिवारात आनंदाचे वातावरण आहे.

“वेलिंगबरोचे नगराध्यक्ष म्हणून काम करायला मिळणे हा एक सन्मान आहे. मी सर्व नागरिकांशी मिळून काम करत एक चैतन्यशील, समावेशक आणि समृद्ध समाज निर्माण करण्यास वचनबद्ध आहे. एकत्रितपणे, आपण आपल्या शहराचे उज्ज्वल भविष्य घडवू,” असे मिश्रा यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

नगर पालिकेच्या नगराध्यक्षाची निवड दरवर्षी निवडून आलेल्या सदस्यांमधून केली जाते. पालिकेच्या बैठकांचे अध्यक्षपद भूषवणे, कामकाज निश्चित करणे आणि स्थायी आदेशांचे स्पष्टीकरण देणे ही त्यांची प्राथमिक भूमिका असते. नगराध्यक्ष नागरी प्रतिनिधी म्हणूनही काम करतात.

कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे सदस्य असलेले राज मिश्रा यांनी त्यांच्या २०२५-२६ च्या कार्यकाळासाठी वेटरन्स कम्युनिटी नेटवर्क आणि लुईसा ग्रेगरीज हॉस्पिस कॅम्पेनची धर्मादाय संस्था म्हणून निवड केली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, राज मिश्रा यांनी सहा वर्षांपूर्वी लंडनमध्ये एमटेकचे शिक्षण घेण्यासाठी त्यांचे मिर्झापूरमधील गाव भाटेहरा सोडले. ते त्यांच्या पालकांचे सहावे अपत्य आहेत. “जेव्हा ते उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले तेव्हा आम्हाला अभियांत्रिकीमध्ये उज्ज्वल करिअरची अपेक्षा होती. पण आम्ही कधीच कल्पना केली नव्हती की ते राजकारणात येतील आणि कधीतरी इंग्लंडमधील एखाद्या शहराचे नगराध्यक्ष होतील,” असे राज मिश्रा यांचे वडील मुन्ना लाल यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मिश्रा यांनी युके नागरिकत्व स्वीकारल्यानंतर प्रतापगड येथील अभिषेकता यांच्याशी लग्न केले. त्यांची पत्नी देखील एक अभियंता आहेत.