महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात जाहीर सभांचे आयोजन करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आता उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून या दौऱ्याची सुरुवात नाशिकपासून होत आहे. मंगळवार आणि बुधवार हे दोन दिवस ठाकरे हे मनसे सत्तास्थानी असलेल्या महापालिकेतील पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेणार असून पक्षाच्या आमदारांसह आयुक्त, महापौर, प्रमुख पदाधिकाऱ्यांशी कामकाजाविषयी चर्चा करणार आहेत. नाशिककरांनी प्रचंड विश्वासाने मनसेच्या ताब्यात पालिकेची सत्ता देऊन वर्ष पूर्ण झाले तरी पालिकेच्या कामकाजात कोणताच फरक नाशिककरांना जाणवत नसल्याने विरोधकांकडून सातत्याने टीका होत आहे. या पाश्र्वभूमीवर ठाकरे हे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. ठाकरे यांचे मंगळवारी दुपारी चार वाजता शहरात आगमन होणार असून मुंबईनाका येथे महापौर, पक्षाचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी त्यांचे स्वागत करणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे यांनी दिली आहे. ठाकरे हे गोल्फ क्लब विश्रामगृहात मुक्कामी थांबणार असून सायंकाळी ते प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेणार आहेत. या बैठकीत ते पदाधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत. दुसऱ्या दिवशी ते पालिका आयुक्त संजय खंदारे यांच्याशी विविध विकास कामांसंदर्भात चर्चा करणार आहेत. या बैठकीनंतर आमदार, महापौर, सभागृहनेते, गटनेते यांच्याशी ते चर्चा करतील. ठाकरे हे या भेटीत महापौरांसह पदाधिकाऱ्यांना विकास कामांसंदर्भात काय सूचना करतात, याकडे विरोधकांचेही लक्ष लागणार आहे. गुरुवारी ठाकरे हे नंदुरबारकडे प्रस्थान करणार असून त्यानंतर ते धुळे येथेही जाणार आहेत. उत्तर महाराष्ट्रातील त्यांची सभा शुक्रवारी जळगाव येथे होणार आहे. ठाकरे यांच्या विभागवार आयोजित सर्व सभांना तुडुंब प्रतिसाद मिळत असल्याने जळगावच्या त्यांच्या जाहीर सभेलाही विक्रमी प्रतिसाद मिळावा, यासाठी कार्यकर्त्यांकडून प्रयत्न केले जात आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Apr 2013 रोजी प्रकाशित
राज ठाकरे आजपासून उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर
महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात जाहीर सभांचे आयोजन करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आता उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून या दौऱ्याची सुरुवात नाशिकपासून होत आहे.
First published on: 02-04-2013 at 04:14 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray visit on north maharashtra from today