Raja Raghuvanshi Murder Case: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात मेघालय पोलिसांनी ७९० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. पूर्व खासी हिल्स पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे की, राजा रघुवंशी यांची हत्या त्याची पत्नी सोनम रघुवंशीच्या उपस्थितीत करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे की, राजा रघुवंशीच्या हत्येचा कट पत्नी सोनम आणि तिचा प्रियकर राज कुशवाह यांनी रचला होता.

११ मे रोजी लग्न झाल्यानंतर राजा आणि सोनम २१ मे रोजी हनिमूनसाठी शिलाँगला गेले होते. २३ मे रोजी त्यांनी त्यांचे कुटुंबीयांशी शेवटचे बोलणे झाले होते. २ जून रोजी राजाचा मृतदेह एका दरीत आढळला. त्यानंतर सोनम बेपत्ता झाली होती. ती ९ जून रोजी उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या एका ढाब्यावर आढळली होती. तिला अटक करून शिलाँगला आणण्यात आले. त्यानंतर या प्रकरणातील इतर आरोपींनाही अटक करण्यात आले होते.

आरोपपत्रात काय आहे?

मेघालय पोलिसांनी सोहरा उपविभाग न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात राजाच्या हत्येचा कट कसा रचण्यात आला आणि गुन्हा कसा घडवला गेला याचे वर्णन केले आहे. मेघालय पोलिसांच्या एसआयटीने केलेल्या तपासात सोनमचे राज कुशवाहासोबत प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले. त्याने सोनमसोबत मिळून राजाच्या हत्येचा कट रचला आणि तिघांना राजाच्या हत्येती सुपारी दिली. पोलिसांनी आरोपपत्रात पुढे म्हटले आहे की, आकाश सिंग राजपूत, विशाल सिंग चौहान आणि आनंद कुर्मी यांनी राजाची हत्या केली आणि सोनम रघुवंशीच्या उपस्थितीतच ही हत्या करण्यात आली.

पहिला वार कोणी केला?

पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, विशाल सिंग चौहानने प्रथम राजा रघुवंशींवर कुऱ्हाडीने हल्ला केला. स्थानिक भाषेत या हत्याराला “दाओ” म्हणतात. राजावर वार केला त्यावेळी सोनम तिथेच होती. वार झाल्यानंतर राजा वेदनेने विव्हळू लागाल तेव्हा ती तिथून पळून गेली आणि राजाचा श्वास बंद झाला तेव्हाच परतली.

रक्ताने माखलेले कपडे आणि…

मेघालय पोलिसांनी सांगितले आहे की, त्यांच्याकडे हत्येतील हत्यार, रक्ताने माखलेले कपडे, हॉटेलमधून जप्त केलेल्या वस्तू, सीसीटीव्ही फुटेज आणि गाईडसह अनेक लोकांचे जबाब पुरावे म्हणून आहेत. पोलिसांनी सांगितले की सोनमचे मंगळसूत्र आणि पायाची जोडवी देखील हॉटेलमधून जप्त करण्यात आली आहे.