Old Age Women Gives Birth to 17th Child: राजस्थानमध्ये एक दुर्मिळ घटना समोर आली आहे. एक ५५ वर्षांची महिला १७व्यांदा आई झाली आहे. राजस्थानच्या उदयपूर जिल्ह्यातल्या लिलावास गावात सदर महिला तिच्या कुटुंबासोबत राहते. रेखा कालबेलिया असे या महिलेचे नाव असून झडोल ब्लॉकच्या कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये त्यांची प्रसूति झाली. हा प्रकार उघड झाल्यानंतर सर्वत्र त्यासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे ही आपली चौथी प्रसूति असल्याचं या महिलेनं डॉक्टरांना खोटं सांगितलं होतं. खरी बाब समजल्यानंतर डॉक्टरांनीदेखील महिलेच्या प्रकृतिसंदर्भात चिंताजनक स्थिती झाली असती, असं विधान केलं आहे.
नेमका प्रकार काय?
कावरा राम कालबेलिया यांच्या ५५ वर्षीय पत्नी रेखा कालबेलिया १७व्यांदा गर्भवती राहिल्या तेव्हाच त्यांच्याबाबत चर्चा सुरू झाली होती. याआधी रेखा यांनी १० मुले व ६ मुली झाल्या. यापैकी ४ मुले व एक मुलगी जन्मल्यानंतर काही दिवसांतच दगावली. नव्या प्रसूतिमध्ये या दाम्पत्याला मुलगा झाला असून आता त्यांना एकूण ७ मुले व पाच मुली आहेत.
मुलांची लग्न, नातवंडंही भेटीला!
एनडीटीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार, या दाम्पत्याची दोन मुले व तीन मुलींची लग्नं झाली आहेत. खुद्द कावरा कालबेलिया यांनीच ही माहिती दिली. या विवाहित मुलांना प्रत्येकी दोन ते तीन मुले आहेत. त्यामुळे रेखा कालबेलिया १७व्यांदा गर्भवती राहण्याच्याही काही वर्षे आधीच त्या आज्जी झाल्या होत्या. त्यांच्या प्रसूतिच्या काही दिवस आधीच त्यांना आणखी एक नातू झाला होता. प्रसूतिनंतर त्यांचे नातूही त्यांना भेटायला आले होते!
कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची
दरम्यान, कालबेलिया कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताचीच आहे. कावरा कालबेलिया यांचा भंगारचा व्यवसाय आहे. मुलांची लग्नं आपल्याला व्याजाने पैसे उधार घेऊन त्यातून करावी लागल्याचं कावरा कालबेलिया यांनी सांगितलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या संपूर्ण कुटुंबात आत्तापर्यंत एकही सदस्य शाळेत गेलेला नाही!
डॉक्टरांना खोटं सांगून केली प्रसूति
दरम्यान, गावापासून लांबच्या कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये प्रसूतिसाठी गेलेल्या कालबेलिया कुटुंबानं डॉक्टरांना खोटं सांगूनच प्रसूति करून घेतली. रेखा १७व्यांदा गर्भवती राहिलेल्या असूनही हे त्यांचं चौथं अपत्य असल्याची माहिती त्यांनी हेल्थ सेंटरमध्ये दिली. खरा प्रकार लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी रेखा यांच्या प्रकृतिबाबत चिंता व्यक्त केली. “आम्हाला नंतर समजलं की रेखा यांनी आधी १६ मुलांना जन्म दिला आहे. इतक्या वेळा गर्भवती राहिल्यामुळे डिलीव्हरीमध्ये गुंतागुंत निर्माण होते. यात आईच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो. पण सुदैवाने रेखा यांच्याबाबतीत सारंकाही सुरळीत पार पडलं”, अशी प्रतिक्रिया हेल्थ सेंटरचे डॉक्टर रोशन रस्तोगी यांनी दिली.