राजस्थानच्या अलवारमधील बहरोड येथे हातकड्या घातलेल्या व अर्धनग्नावस्थेत असलेल्या १३ आरोपींची पोलिसांनी भर बाजारात धिंड काढली. या सर्व आरोपींवर हरियाणाचा गँगस्टर विक्रम उर्फ पपला याला पोलिसांच्या तावडीतून फरार केल्याचा आरोप आहे. रविवारी या सर्व १३ आरोपींची भर बाजारात अर्धनग्नावस्थेत धिंड काढण्यात आली.६ सप्टेंबर रोजी बहरोड पोलीस स्टेशनमधुन गँगस्टर विक्रमसिंह उर्फ पपला पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला होता.
गुन्ह्याचे पुर्नरावलोकन करण्यासाठी या १३ आरोपींची धिंड काढण्यात आली होती, जनतेला यातून कुठलाही संदेश देण्याचा उद्देश नव्हता असे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेचे नागिरकांनी मोबाइलमध्ये शुटींग करून घेतले तर काहींनी फोटे देखील काढले.
भिवाडीचे पोलीस अधीक्षक अमनदीप सिंह कपूर व अतिरिक्त पोलीस अधीक्षक करण शर्मा यांच्या नेतृत्वात हातकडी घातलेल्या १३ आरोपींची भर बाजारात धिंड काढण्यात आली होती. याबाबत पोलीस अधीक्षक अमनदीप सिंह कपूर म्हणाले की, गुन्ह्याचे पुर्नरावलोकन करण्याच्या उद्देशाने आम्ही या आरोपींची धिंड काढली आहे. ही एक गुन्हेगारी प्रकरणांच्या तपासामधील नियमीत बाब आहे. याद्वारे जनतेला कोणताही संदेश देण्याचा आमचा हेतू नव्हता. कमांडो पथकासह १५० जवानांच्या गटाबरोबर या सर्व आरोपींना दोन किलोमीटर भर बाजारातून चालवले गेले. यानंतर त्यांना पोलिसांच्या वाहनात बसवण्यात आले.
महामार्ग पोलीस पथकाने गँगस्टर विक्रमसिंह याला ६ सप्टेंबर रोजी पकडले होते. या घटनेची माहिती सर्वत्र पसरल्यानंतर काही तासांमध्येच एके-47 व सेमी ऑटोमॅटीक हत्यारांसह आलेल्या १३ आरोपींनी पोलीस स्टेशनवर हल्ला करत, विक्रमला फरार केले होते. यानंतर अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींची भर बाजारात अशाप्रकारे धिंड काढल्या गेली.
याप्रकरणी एकूण २० जणांना अटक करण्यात आलेली आहे. त्यातील या १३ आरोपींचा प्रत्यक्ष हल्ल्यात सहभाग होता. तर उर्वरीत सात जणांनी पोलीस स्टेशनमधुन फरार झाल्यानंतर गँगस्टर विक्रमला विविध ठिकाणी मदत केलेली आहे. गँगस्टर विक्रम अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नसल्याने, सामान्य जनेतून पोलिसांविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच याप्रकरणी दोन पोलीस कॉन्स्टेबल देखील निलंबीत करण्यात आलेले आहे. तर ६९ पोलीस शिपायांची अन्य कामांवर बदली करण्यात आली आहे.