राजस्थानमधील ३४ वर्षीय अंजू राफेल या मुलीने जुलै महिन्यात पाकिस्तानात पळून जाऊन तिच्या फेसबुकवरील मित्राशी लग्नगाठ बांधली होती. हे लग्न झाल्यानंतर अंजू चर्चेत आली होती. इंटरनेटवर दोघांच्याही प्रेमकथेबद्दल चवीने चर्चा झाली. मात्र अवघ्या काही महिन्यातच अंजू भारतात परतली आहे. लाईव्ह हिंदुस्तान या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, अंजू वाघा बॉर्डरवरून भारतात आली. तिथे सीमा सुरक्षा दलाच्या चौकीत तिची चौकशी करण्यात आली. त्यानंतर पुढीच चौकशीसाठी तिला दिल्ली येथे नेण्यात आले. बुधवारी भारतात आल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधिंनी तिला याबाबत प्रश्न विचारला. “मी खूश आहे, मला यापेक्षा अधिक काही बोलायचे नाही”, अशी प्रतिक्रिया अंजूने दिली.

अंजूने जुलै महिन्यात पाकिस्तानच्या व्हिसाच्या आधारे वाघा बॉर्डर-अटारी बॉर्डर येथून पाकिस्तानात प्रवेश केला होता. तिचा फेसबुकवरील मित्र आणि खैबर जिल्ह्यातील रहिवासी नसरुल्लाह (वय २९) याला भेटण्यासाठी ती पाकिस्तानात गेली होती. तिथे गेल्यानंतर तिने नसरुल्लाहशी लग्न करत इस्लाम धर्म स्वीकारला आणि फातिमा नाव धारण केले, असे सांगितले जात होते.

हे वाचा >> भारतातून पाकिस्तानात गेलेली अंजू आता फातिमा, इस्लाम स्वीकारुन नसरुल्लाहशी केला निकाह

अंजूच्या लग्नाची बातमी समोर आल्यानंतर अंजूचा भारतातील पती अरविंद कुमार याने पोलिसांत भादंवि कलम ३६६ अनुसार (लग्नाचे आमिष दाखवून महिलेचे अपहरण), कलम ४९४ (पहिल्या पती किंवा पत्नीला घटस्फोट न देता दुसरे लग्न करणे), कलम ५०० (अब्रूनुकसानी) आणि कलम ५०६ (गुन्हेगारी धमकी) अशाप्रकारचे गुन्हे दाखल केले होते. राजस्थानच्या भिवाडी येथे राहणाऱ्या अरविंद कुमार आणि अंजूला दोन मुले आहेत. लग्नाच्या इतक्या वर्षांनंतर तिने हे पाऊल उचलल्यामुळे इंटरनेटवर तिच्यावर अनेकांनी टीका केली होती.

ऑक्टोबर महिन्यात समोर आलेल्या बातमीनुसार, अंजूला आपल्या मुलांना भेटायचे असल्यामुळे ती भारतात येणार असल्याचे सांगितले जात होते. तिला १५ वर्षांची मुली आणि सहा वर्षांचा मुलगा आहे. त्यावेळी भिवाडी पोलिसांनी सांगितले की, अंजू भारतात मुलांना भेटायला आल्यानंतर तिची आणि अरविंद कुमार यांची चौकशी करण्यात येईल.

“दोन्ही पती-पत्नींना एकत्र बसवून त्यांची औपचारिक चौकशी केली जाईल”, अशी प्रतिक्रिया भिवाडीचे पोलिस अधिक्षक योगेश दाढीचा यांनी हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना दिली.

आणखी वाचा >> अंजूच्या निकाहाबाबत काय म्हणाली सीमा हैदर?, “पाकिस्तानात कळलं असतं की हिंदू…”

अंजूचा पाकिस्तानमधील कथित पती नसरुल्लाहने सांगतिले की, अंजू ऊर्फ फातिमा हीने राजस्थानमध्ये जाण्यासाठी सरकारची रितसर परवानगी घेतली आहे. “प्रवासाची परवानगी मिळावी यासाठी आम्ही पाकिस्तानच्या आंतर्देशीय मंत्रालयाकडे अर्ज सादर केला होता. ना-हरकत प्रमाणपत्र मिळण्याची आम्ही वाट पाहत होतो. ना-हरकत प्रमाणपत्र मिळण्यास थोडा उशीर झाला असला तरी ते मिळाले आहे”, अशी प्रतिक्रिया नसरुल्लाहने पाकिस्तानमधील वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.