राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यात मंगळवारी हवेत एक अज्ञात वस्तु निदर्शनास पडली. आज सकाळी १०.३० ते ११ या वेळेत फुग्याच्या आकारातील ही वस्तू रडावरवर दिसली. त्यानंतर हवाई दलाचे सुखोई-३० हे लढाऊ विमान या वस्तुला खाली आणण्यासाठी रवाना करण्यात आल्याचे दिसल्याचे भारतीय हवाई दलाकडून सांगण्यात आले. दरम्यान, बारमेर जिल्ह्यातीलच गुगरी या गावानजीक स्फोटाचा मोठा आवाज आल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. या घटनेनंतर परिसराची पाहणी करण्यात आली असता याठिकाणी चार ते पाच टोकदार वस्तू सापडल्या. अशाचप्रकारच्या टोकदार वस्तू या भागातील पानवाडा गावातही सापडल्या आहेत. दरम्यान, या वस्तू ताब्यात घेण्यात आल्या असून याप्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, एएनआय वृत्तसंस्थेने काही वेळापूर्वी दिलेल्या माहितीनुसार, चुकीमुळे भारतीय हवाई दलाच्या विमानातून या परिसरात पाच बॉम्ब खाली पडले होते.