चारित्र्यावरुन संशय! पतीने पत्नीचे तीन महिने केले हाल…

या महिलेला वाचवण्यात आलं, त्यानंतर तिने सांगितलं की तिचा पती तिचा शारिरीक आणि मानसिक छळही करत होता.

crime news extra marital affair
विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरुन पतीने पत्नीला तीन महिन्याहून अधिक काळ साखळ्यांनी बांधून ठेवलं होतं. (प्रातिनिधिक छायाचित्र)

आपल्या पत्नीचे विवाह्यबाह्य संबंध असल्याच्या संशयावरुन पतीने तिला लोखंडी साखळीने बांधून ठेवलं. तेही थोडंथोडकं नव्हे तर तब्बल तीन महिने! राजस्थानमध्ये ही घटना घडली आहे. ह्या साखळ्यांचं वजन होतं तब्बल ३० किलो. पोलिसांनी संबंधित घटनेतल्या आरोपीला अटक केली असून या महिलेला त्याच्या ताब्यातून सोडवलं आहे.

राजस्थानमधल्या प्रतापगढ जिल्ह्यातल्या एका छोट्या गावात ही घटना घडली आहे. पोलिसांनी सांगितलं की त्यांना अशी माहिती मिळाली की या भागात एका महिलेला साखळ्यांनी बांधून ठेवलं आहे. त्या माहितीनुसार पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली. तेव्हा त्यांनी पाहिलं की या महिलेला साखळ्यांनी बांधलं होतं आणि या साखळ्यांना दोन कुलुपंही लावलेली होती.

हेही वाचा- घृणास्पद! हुंड्याच्या लालसेपोटी पतीने आपल्यासमोरच करवला पत्नीवर अमानुष बलात्कार

या ४० वर्षीय पीडितेने सांगितलं की, साधारण होळीच्या दरम्यान तिच्या पतीने तिच्यावर संशय घेत तिला साखळ्यांनी बांधून ठेवलं. आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध आहेत असा संशय त्याला होता. तिने सांगितलं की ती तिच्या वृद्ध आईला शेतीच्या कामात मदत करायला जात होती. मात्र, तिथे तिचा पती यायचा आणि घरच्यांसमोर तिला मारहाण करायचा.

ही पीडिता म्हणाली, मी फक्त माझ्या वृद्ध आईची काळजी घेत होते. पण माझा पती दारु पिऊन यायचा आणि मला मारहाण करायचा. त्याला संशय होता की माझे विवाहबाह्य संबंध आहेत. या महिलेने आरोप केला आहे की, होळी सणाच्या दोन-तीन दिवस आधीपासून तिच्या पतीने तसंच तिच्या मुलाने परिवारातल्या काही इतर सदस्यांच्या मदतीने तिला बांधून ठेवलं आहे.

तिने पोलिसांना हेही सांगितलं की, तिच्या पतीने तिला तीन महिन्यांपासून साखळ्यांनी बांधून ठेवलं होतं आणि तो तिचा प्रचंड शारिरीक आणि मानसिक छळ करत होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Rajasthan man ties wife with chains for 3 months over suspicion of affair arrested vsk