Rajasthan Principal Suspended For Checking Girl Students Whatsapp And Instagram: राजस्थानातील जोधपूरमधील एका सरकारी कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांना एका विद्यार्थिनीचा मोबाईल फोन तपासल्याबद्दल निलंबित करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. चौकशीदरम्यान प्राचार्यांवरील आरोप सिद्ध झाल्यानंतर माध्यमिक शिक्षण संचालकांनी या कृत्याला विद्यार्थिनीच्या गोपनीयतेचे उल्लंघन असल्याचे म्हणत हा निर्णय घेतला.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शनिवारी पीएम श्री महात्मा गांधी सरकारी महाविद्यालयातील ११ वीच्या एका विद्यार्थिनीने महाविद्यालयात मोबाईल फोन आणला होता. यामुळे प्राचार्य शकील अहमद यांनी तिचा फोन जप्त केला, तो अनलॉक केला आणि तिचे व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम, कॉल डिटेल्स आणि गॅलरी तपासली. प्राचार्यांनी लेखी निवेदनात हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे.

या प्राचार्यांवर असाही आरोप आहे की, त्यांनी विद्यार्थिनीकडे वर्गात तिच्या शेजारी बसणाऱ्या एका मुलाबद्दल चौकशी केली. मुलीने ही घटना तिच्या कुटुंबाला सांगितली, त्यानंतर पालक महाविद्यालयात आले आणि गोंधळ उडाला.

शिक्षण विभागाकडे लेखी तक्रार दाखल करताना कुटुंबाने आरोप केला आहे की, जर फोनमध्ये काही वैयक्तिक माहिती असती, तर प्राचार्यांनी त्याचा गैरवापर केला असता. या तक्रारीनंतर शिक्षण संचालनालयाने चौकशीचे आदेश दिले होते.

चौकशी अहवालानुसार, प्राचार्यांनी हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे. यावेळी त्यांनी असा दावा केला की, विद्यार्थिनीने परीक्षा सुरू असताना कोणते ‘रील’ रेकॉर्ड केले आहे का, हे तपासण्यासाठी त्यांनी तिचा फोन पाहिला.