देशातील अंतर्गत सुरक्षेसाठी धोकादायक ठरत असलेल्या नक्षलवादाचा लवकरच बीमोड करण्यात येईल, असा आशावाद केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.

झारखंडमधील माओवाद्यांच्या अडचणींचा उपाय आम्हाला मिळाला असल्याचा दावाही या वेळी राजनाथ सिंह यांनी केला. झारखंड पोलिसांसाठी उभारण्यात आलेल्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात जवान शहीद झाल्यावर मला आणि पंतप्रधानांना होणाऱ्या वेदना मी शब्दात व्यक्त करू शकत नाही, अशा भावना सिंह यांनी व्यक्त केल्या.

जवानांना पायाभूत सुविधा मिळाल्यास त्यांच्यासमोरील अडचणी कमी करण्यास मदतच होते. नक्षलवाद्यांचा मोठा गट असून त्यांच्याकडून सातत्याने पोलीस आणि जवानांवर हल्ले करण्यात येतात. मात्र, या नक्षलवादी गटाचा बीमोड करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात पोलीस आणि जवानांकडे मोहीम सोपविण्याचा आमचा विचार असल्याचेही राजनाथ सिंह यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे नक्षलवाद्यांचा सर्वाधिक त्रास स्थानिक आदिवासींना सहन करावा लागत असल्याने झारखंड आणि गडचिरोलीसारख्या भागांत विकास कार्यक्रम मोठय़ा प्रमाणात राबविण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले. त्यामुळे या ठिकाणची परिस्थिती बदलण्यास मदत होणार आहे.